

शालेय वाहतूक सुरक्षित होणार
बस व वाहतूक व्यवस्थेत कडक नियमांची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेत कडक नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ मसुद्याबाबत जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पंधरा दिवसांत जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. सुरक्षितता, पारदर्शकता व जबाबदारीवर भर देणाऱ्या या नियमांमुळे पालक-विद्यार्थ्यांचा विश्वास वाढेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
नवीन नियमांनुसार शालेय बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करेल. फक्त मासिक भाडे आकारता येईल. एकरकमी रक्कम बंदीमुळे पालकांना आर्थिक लाभ होईल. प्रत्येक शाळेत स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी स्थापन होईल. ती भाडे, सुरक्षितता व सेवांवरील तक्रारी त्वरित सोडवेल आणि तिमाही अहवाल सादर करेल.
सर्व बस-व्हॅनमध्ये जीपीएस-व्हीएलटीडी, पॅनिक बटण, एफडीएएस, सीसीटीव्ही व सीट बेल्ट सक्तीचे आहे. डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग, उपस्थिती नोंद, अलर्ट व पालकांना माहिती मिळेल. राज्यस्तरीय प्लॅटफॉर्मशी जोडले जाईल. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी महिला परिचारिका, अपंगांसाठी विशेष सुविधा आणि कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक राहील.
==
उल्लंघनास कठोर कारवाई
नियम लागू होऊन तीन महिन्यांत वाहने सुसज्ज करणे आवश्यक अन्यथा परवाने निलंबित-रद्द होतील. शिक्षण व परिवहन विभाग संयुक्त तपासणी करून जिल्हा समितीकडे अहवाल पाठवतील. या सुधारणांमुळे वाहतूक शिस्तबद्ध व तंत्रज्ञानाधारित होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.