पाॅड टॅक्सीने रिक्षा चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

पाॅड टॅक्सीने रिक्षा चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Published on

पाॅड टॅक्सीने रिक्षाचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
कुर्ला-वांद्रे स्थानकादरम्यान परिणाम; रिक्षाचालकांमध्ये नाराजी
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : खासगी सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या पाॅड टॅक्सी प्रकल्पामुळे वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार असला तरी रिक्षाचालकांवर मात्र बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. वांद्रे आणि कुर्ला स्थानकापासून बीकेसीदरम्यान दररोज ८००-९०० रिक्षा धावतात, परंतु येथे पाॅड सेवा सुरू झाल्यानंतर आमच्या रोजगाराचे काय, आम्ही कुठे व्यवसाय करायचा, असा सवाल रिक्षाचालकांकडून विचारला जात आहे.
एमएमआरडीएकडून मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. तसेच आता प्रवाशांना वांद्रे-कुर्ला स्थानकात सहजपणे पोहोचता यावे, यासाठी वांद्रे-कुर्ला स्थानकादरम्यान एलिव्हेटेड स्वयंचलित पाॅड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार आहे. एमएमआरडीए-बीकेसी कनेक्टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत असून, त्याचे नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हास्ते भूमिपूजन झाले आहे.
पुढील २० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याने दोन्ही स्थानकांदरम्यान व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. मेट्रो, ओला-उबेर, रॅपिडो बाइकने आधीच आमचा व्यवसाय खाल्ला आहे. त्यामुळे ७००-८०० रुपये व्यवसाय करणे मुश्कील झालेले असतानाच आता पाॅड टॅक्सी सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनणार असल्याची खंत रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारने आमचा विचार करावा!
वातानुकूलित प्रवास मिळेल, आमच्या रोजगाराचा प्रश्न
पाॅड टॅक्सीमुळे वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित गारेगार प्रवास मिळेल. मात्र, आमचा धंदा पुरता बसणार असल्याचे विशाल जाधव या रिक्षाचालकाने सांगितले. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी दररोज जवळपास १,५०० रुपये धंदा होत होता. मात्र, आता मेट्रो, ओला-उबेर टॅक्सी, रॅपिडो बाइकमुळे धंदा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात आमचा रोजगार राहील की नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या रोजगाराचा विचार करायला हवा, अशी भावना रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

पाॅड टॅक्‍सी प्रकल्पाचा थेट फटका रिक्षाचालकांना बसणार आहे. रिक्षाचालक बेरोजगार होणार असल्याने त्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण होऊन बसेल.
- के. के. तिवारी,
अध्यक्ष, भाजप रिक्षा-टॅक्सी सेल

रिक्षाचालकांचा धंदा आधीच कमी झाला आहे. सातशे-आठशे रुपये दररोज धंदा होतो. मात्र, त्यात गॅस, देखभालीचा खर्च काढला, तर हातात किरकोळ रक्कम राहते. त्यातच आता पाॅड टॅक्सीसारखे प्रकल्प आल्यास धंदा पुरता बुडेल.
- विजय दळवी, रिक्षाचालक

रिक्षा चालवून आम्ही कसेबसे कुटुंब चालवत आहोत. मात्र, पाॅड टॅक्सीसारखे प्रकल्प आमचे प्रवास पळवणार असतील, तर धंदा कारायचा कसा, असा हा प्रश्न आहे. पाॅड टॅक्सी म्हणजे थेट रिक्षाचालकांच्या पोटावर पाय येणार आहे.
- संजय सिंग, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com