मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ''सुपरफास्ट''; अवघ्या ८ तासांत मिळणार उपचार खर्च!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ''सुपरफास्ट''; अवघ्या ८ तासांत मिळणार उपचार खर्च!
Published on

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ‘सुपरफास्ट’!
अवघ्या आठ तासांत मिळणार उपचार खर्च

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी मिळणारी आर्थिक मदत आता अधिक वेगवान होणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने विकसित केलेली अद्ययावत ऑनलाइन प्रणाली लवकरच कार्यान्वित होत आहे. या नव्या सुविधेमुळे मदतीचा अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया अवघ्या आठ कार्यालयीन तासांत पूर्ण होणार आहे. रुग्णांना आता अर्जासाठी पायपीट करावी लागणार नाही.

​या प्रणालीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, आता रुग्णाऐवजी थेट संबंधित रुग्णालयामार्फतच अर्ज सादर केला जाणार आहे. रुग्णाने केवळ आवश्यक कागदपत्रे रुग्णालयात जमा केल्यास, तिथूनच तो प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे पाठवला जाईल. यामुळे नातेवाइकांची धावपळ थांबणार आहे. गंभीर रुग्णांच्या उपचाराला तातडीने गती मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या काही दिवसांत होणार आहे.

​गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचा ओघ कायम होता. या काळात राज्यातील ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी सहा लाख ८१ हजार ५०० रुपयांची विक्रमी वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. नवनवीन रुग्णस्नेही बदल केल्यामुळेच हा आकडा गाठणे शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे प्रशासकीय दिरंगाई संपून थेट आणि जलद मदत पोहोचवणे शक्य होईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर ही यंत्रणा राज्यभर प्रभावीपणे राबवली जाईल, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
--
महत्त्वाचे बदल :
​वेळेची बचत : आठ तासांत अर्जाचा निकाल लागणार
​कागदपत्रांची जबाबदारी : अर्ज भरण्याची जबाबदारी आता संलग्न रुग्णालयांची
​पारदर्शकता : ऑनलाइन प्रणालीमुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येणार
​हेल्पलाइन : अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com