

सफाई कर्मचाऱ्यांसाठी ५८० घरांची उभारणी
मुंबई, ता. १३ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. चेंबूर येथील पी. एल. लोकंडे मार्गावर आश्रय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ५८० सदनिका बांधण्यासाठी पालिकेने ई-निविदा जाहीर केली आहे. ही घरे आधुनिक प्रीफॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन अँड बिल्ट तत्त्वावर उभारली जाणार आहेत. ही घरे ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची असतील. जलद आणि दर्जेदार बांधकामासाठी पालिकेने प्रीफॅब्रिकेशन तंत्रज्ञानाची निवड केली आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये बयाणा रक्कम निश्चित करण्यात आली आहे. निविदा विक्री आजपासून (ता. १३) सुरू झाली आहे.