

बीआयटी चाळ जपतेय महामानवाच्या पाऊलखुणा
प्रदीर्घ संघर्षाची मूक साक्षीदार
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : परळच्या गजबजलेल्या भागात बेस्ट वसाहतीसमोर उभी असलेली बीआयटी चाळ क्रमांक १ कडे पाहिल्यास ही मुंबईतील इतर कामगार चाळींसारखीच सामान्य दिसते. मात्र, या वास्तूच्या भिंतींनी आधुनिक भारताचा इतिहास घडताना पाहिला आहे. ही केवळ एक इमारत नसून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील ‘भीमराव’ ते ‘बाबासाहेब’ या महान परिवर्तनाच्या प्रदीर्घ संघर्षाची मूक साक्षीदार आहे.
या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरील ५० आणि ५१ क्रमांकाच्या खोल्यांमध्ये बाबासाहेब आणि माता रमाई यांनी १९१२ ते १९३४ असा सुमारे २२ वर्षांचा प्रदीर्घ काळ व्यतीत केला. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश लष्करात होते. त्यांच्या ओळखीने या दोन खोल्या या कुटुंबाला मिळाल्या होत्या. ५० क्रमांकाच्या खोलीत गृहस्थी चालत असे, तर समोरच्या ५१ क्रमांकाच्या खोलीत बाबासाहेब तासन्तास अभ्यास करीत. सामाजिक न्याय आणि दलितांच्या हक्कांसाठी पुकारलेल्या चळवळीची अनेक बीजे याच वास्तूत रोवली गेली. याच चाळीच्या पायथ्याशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपली त्या वेळची महागडी ‘इम्फाला’ गाडी घेऊन बाबासाहेबांच्या भेटीसाठी आले होते. याच भेटीत त्यांनी ‘मूकनायक’ वृत्तपत्रासाठी २,५०० रुपयांची देणगी दिली आणि माता रमाईंच्या हातचा चहा घेतला. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे संपूर्ण नियोजनही याच हाकेच्या अंतरावर असलेल्या दामोदर हॉलमधील कार्यालयातून झाले होते. पावलोपावली बाबासाहेबांच्या पाऊलखुणा जाणवणाऱ्या या वास्तूचा इतिहास नव्या पिढीपर्यंत संरक्षित राहील का, असा प्रश्न आता इथल्या रहिवाशांना सतावतो आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे हीच महामानवाला खरी आदरांजली ठरेल.
...
संघर्षाचा काळ
बाबासाहेबांसाठी तो काळ जितका बौद्धिक संघर्षाचा होता, तितकाच कौटुंबिकदृष्ट्या वेदनादायी होता. याच चाळीत राहताना त्यांनी आपली चार मुले गमावली. राजरत्नच्या मृत्यूनंतर तर बाबासाहेब इतके खचले की त्यांनी पुन्हा या घराचे तोंड पाहिले नाही, असे ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार सांगतात. माता रमाईंनी याच परिसरात गोवऱ्या थापण्यापर्यंतचे काबाडकष्ट करून बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी साथ दिली.
...
माशांची आवड
बाबासाहेबांनी २२ वर्षांच्या वास्तव्यानंतर या खोल्या आपले विश्वासू सहकारी सखाराम ताडीलकर आणि नातेवाईक खैरे यांना दिल्या. आजही त्यांची पुढची पिढी हा वारसा जपत आहे. चाळीतील ज्येष्ठ नागरिक अशोक पाने म्हणतात, ‘‘पूर्वी रात्री या इमारतीखाली असलेल्या एकाच लॅम्पपोस्टच्या प्रकाशात बाबासाहेब अभ्यास करायचे. शेजारी मासे शिजले की मागून घ्यायचे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.