आता नायर रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी

आता नायर रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी
Published on

आता नायर रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी
कर्मचाऱ्याला प्रतिमहिना २९ हजार ३६२ रुपये पगार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे महापालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्‍येक कर्मचाऱ्याला प्रतिमहिना २९ हजार ३६२ रुपये पगार दिला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे महापालिकेने सर्वच रुग्णालयांत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. नायर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १७१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. रुग्णालयात जिथे कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल, अशा ठिकाणी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
कंत्राटी कर्मचारी असले तरी त्यांना मूळ वेतनासह घरभाडे, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी हे सर्व फायदे दिले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांची मूळ वेतन ११,५०० असून महागाई भत्ता ९,१०० रुपये देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचारी विमा योजनेचाही लाभ देण्यात येणार आहे.
भविष्य निर्वाह निधीमध्ये १,९५० रुपये प्रति कर्मचारी टाकण्यात येणार आहेत, तर ८.३३ टक्के सानुगृह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे. ४७१ दिवसांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना प्रतिदिवस ९७९ रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला सात कोटी ८८ हजार ४९ हजार रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, लवकरच या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
नायर रुग्णालयाच्या धर्तीवर पालिकेच्या अन्य रुग्णालयात कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता लक्षात घेऊन, कंत्राटी बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कायमस्वरूपी हक्क सांगता येणार नाही
मुंबई महापालिकेमध्ये आतापर्यंत शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र, काही दिवस काम केल्यानंतर कंत्राटी कामगारांकडून पालिका सेवेत कायमस्वरूपी करण्याची मागणी करण्यात येते. यावरून कामगार संघटना आंदोलन पुकारून कामकाजामध्ये व्यत्यय आणतात. त्यामुळे नायर रुग्णालयात बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांना महापालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी दावा करता येणार नाही. यासाठी तसा करारनामा लिहून घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com