

रक्तसाठा नोंद न केल्यास दंड
संकेतस्थळावर माहिती देणे बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नियमांनुसार राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक आहे. ही माहिती जाहीर न केल्यास संबंधित रक्तपेढीवर प्रतिदिन एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. या नियमाचे पालन न केल्यामुळे मागील तीन वर्षांत मुंबईतील विविध शासकीय रक्तपेढ्यांवर एकूण दोन लाख ५१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
या दंडामध्ये कूपर रुग्णालय, जे. जे. महानगर रक्तपेढी, रेडक्रॉस, शीव रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय तसेच भाभा रुग्णालय यांच्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे.
नागरिकांना आवश्यकतेच्या वेळी तातडीने रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रक्तपेढ्यांनी रक्तसाठ्याची माहिती नियमितपणे जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, ही माहिती ज्या दिवशी प्रसिद्ध केली जात नाही, त्या दिवशी संबंधित रक्तपेढीवर दंड आकारला जातो. तरीदेखील अनेक रक्तपेढ्या या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील तीन वर्षांत आकारण्यात आलेल्या दोन लाख ५१ हजार रुपयांपैकी केवळ २१ हजार रुपयेच वसूल झाले असून, उर्वरित दोन लाख ३० हजार रुपये अद्याप थकबाकी आहे.
सर्वाधिक दंड ठोठावलेल्या रक्तपेढ्या
मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये जे. जे. महानगर रक्तपेढीवर सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. कूपर रुग्णालयावर २७ वेळा दंड आकारला आहे. त्यांनी एकदाही दंड भरलेला नाही. जे. जे. रक्तपेढीवर २६ वेळा दंड आकारण्यात आला असून, त्यातील केवळ एकदाच दंड भरला गेला आहे. उर्वरित २५ हजार रुपये प्रलंबित आहेत. रेडक्रॉसवर २५ वेळा, तर सेंट जॉर्ज व भाभा रुग्णालयांवर प्रत्येकी २१ वेळा दंड आकारण्यात आला आहे. त्यांनीही दंड भरलेला नाही. शीव रुग्णालयावर २० वेळा दंड ठोठावण्यात आला आहे.
कमी दंड असलेल्या रक्तपेढ्या
जी. टी. रुग्णालयावर पाच वेळा दंड आकारण्यात आला असून, त्यातील एकदाच रक्कम भरली आहे. राजावाडी रुग्णालयावर चार वेळा दंड आकारला असून, दोन वेळा भरणा करण्यात आला आहे. व्ही. एन. देसाई रुग्णालयावर तीन वेळा, टाटा रुग्णालय, जे. जे. रुग्णालय व जगजीवन रक्तपेढीवर प्रत्येकी दोन वेळा दंड आकारण्यात आला आहे. नायर रुग्णालयाने मात्र सर्व आठ वेळचा दंड पूर्णपणे भरला आहे.
परिषदेकडून इशारा
संकेतस्थळावर वेळेत माहिती न जाहीर केल्यास दंड आकारला जातो. मात्र, अनेक रक्तपेढ्या तो तत्काळ भरत नाहीत. त्यामुळे परवाना नूतनीकरणाच्या वेळी ही रक्कम वसूल केली जाते. दंड न भरल्यास परवाना नूतनीकरणास परवानगी दिली जात नाही, अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.