

पार्टी ड्रग्जपेक्षा गांजाचा दबदबा
२०२५ मध्ये १,३९७ किलो साठा जप्त
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः नेस्को कॉन्सर्ट प्रकरणामुळे एक्स्टॅसी, एलएसडी पेपर, कोकेन आदी पार्टी ड्रग्जची चर्चा सर्वत्र सुरू झाली असली तरी मुंबईसारख्या महानगरांवर खरा अंमल आहे तो गांजाचाच. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी एकूण कारवाईवरून शहरात अन्य कोणत्याही अमली पदार्थांपेक्षा सर्वाधिक गांजाचे सेवन, विक्री, तस्करी अधोरेखित होते.
पोलिसांनी २०२५ मध्ये अमली पदार्थांशी संबंधित एकूण ७,६२३ कारवाया केल्या. त्यात अमली पदार्थांचे सेवन, वैयक्तिक किंवा विक्रीसाठी साठा बाळगणे, विकणे, अमली पदार्थांची एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक करणे, साठा करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
या कारवायांमध्ये हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी आदी नैसर्गिक, रासायनिक(सिंथेटिक) अमली पदार्थांसह कफ सिरप, आल्फ्राझोलाम किंवा नेट्राव्हाइट आदी नशेसाठी वापरली जाणारी औषधे जप्त केली गेली.
एकूण १७५९ किलो अमली पदार्थ, साधारण १६ हजार औषधी गोळ्या १,७३७ लिटर कफ सिरपचा साठा जप्त झाला. या साठ्याची एकूण किंमत ८५७ कोटींहून अधिक आहे. या कारवाईत सर्वाधिक सेवन, विक्री, तस्करीचे गुन्हे गंजाशी निगडित आहेत. पोलिसांनी ६७६ प्रकरणांमध्ये १३९७ किलो गांजा हस्तगत केला आहे. त्या खालोखाल एमडीशी निगडित २७५ प्रकरणे असून, त्यात ३१३ किलो साठा जप्त झाला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या गांजाच्या खेपेचे उगमस्थान ओडिशा राज्य आहे. येथून मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेतून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होते.
...म्हणून गांजाला पसंती
एमडी, कोकेन किंवा अन्य रासायनिक अमली पदार्थांचे व्यसन प्रामुख्याने तरुणांमध्ये आढळते. किंमत जास्त असल्याने हे अमली पदार्थ विकत घेणाऱ्यांचा ठरावीक वर्ग आणि संख्या मर्यादित आहे. भारतीय गांजाचे उत्पादन, सेवन अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामुळे गांजा सेवन करणाऱ्यांचा ठरावीक वयोगट नाही, तुलनेने स्वस्त असल्याने श्रमिकांमध्ये श्रमपरिहारासाठी दारूपेक्षा गांजाला पसंती दिली जाते. शिवाय नैसर्गिक असल्याने दुष्परिणाम कमी, हा गैरसमज पिढ्यानपिढ्या रुजल्याने गांजाकडे अमली पदार्थ म्हणून पाहायचा दृष्टिकोन नाही.
हायड्रोपोनिक गांजाचे फॅड
गेल्या काही वर्षांत परदेशात पाण्यावर किंवा नियंत्रित वातावरणात गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली. नशेची किक अधिक, सुगंधित किंवा निरनिराळ्या चवीत मिळणारा हायड्रोपोनिक गांजा १०० पटीने महाग विकला जातो. अलीकडच्या काळात मुंबई पोलिसांसह कस्टम, डीआरआय आदी यंत्रणांनी कोट्यवधी रुपयांचा परदेशी गांजा जप्त केला. याचे उगमस्थान प्रामुख्याने थायलंड आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.