नवीन शैक्षणिक धोरणाने समाजाला नवी दिशा

नवीन शैक्षणिक धोरणाने समाजाला नवी दिशा
Published on

नवीन शैक्षणिक धोरणाने समाजाला नवी दिशा
दीक्षान्त सोहळ्यात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. १९ : भारतीय संस्कृती सदैव विश्वबंधुत्व, विश्वशांती, समता आणि समरसतेची प्रेरणा देते. आधुनिक ज्ञानाला मूल्यांशी जोडून एक अशी शिक्षण प्रणाली विकसित करण्याची मोठी आवश्यकता आहे, जी धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण, राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासोबतच समाजात समता आणि समरसता राखण्यास आणि जगाला एक नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरेल. या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी मुंबईत केले.
टाटा सोशल सायन्सचा (टीस्स) ८५ वा दीक्षान्त सोहळा मुंबईतील देवनार संकुलात आयोजित केला होता. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलपती प्रो. डी. पी. सिंह, कुलगुरू प्रो. बद्रीनारायण तिवारी, कुलसचिव नरेंद्र मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी टीस्समधील एकूण १,०८० विद्यार्थी आणि संशोधकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ९७ संशोधकांना पीएचडी, एका संशोधकाला एम.फिल., पदवी देण्यात आली. तसेच ९८२ विद्यार्थ्यांना मास्टर्स, बी.एड., बी.एड., एम.एड. आणि दुहेरी पदव्या प्रदान करण्यात आल्या. कुलगुरू प्रो. तिवारी यांनी टीस्सच्या एकूण विकासाचा आढावा घेत त्यासंदर्भातील प्रस्तावना केली.
राज्यपाल गहलोत पुढे म्हणाले, भारत हा प्राचीन काळापासून बौद्धिक संपदेने समृद्ध राहिला आहे. वेदांपासून ते आजपर्यंत भारतीयांनी सर्व क्षेत्रांत अतुलनीय ज्ञान संपादन केले आहे. खगोलशास्त्रापासून ते भूविज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र आणि इतर अनेक क्षेत्रांतील भारतीयांचे योगदान संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे राहिले आहे. त्यात आजचे युग हे जलद बदल, तंत्रज्ञान, नावीन्य आणि जागतिक स्पर्धेचे युग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सायबर आणि सुरक्षा तसेच डिजिटल नावीन्य यांसारख्या क्षेत्रांत सातत्याने नवीन संधी निर्माण होत आहेत. या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात सतत शिकण्याची वृत्ती, नावीन्यपूर्ण विचार आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असे त्‍यांनी सांगितले. कुलपती प्रो.सिंह यांनी टीस्समधील शिक्षणाचा उद्देश हा ज्ञानासोबतच समाजाचे प्रश्न, त्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com