ड्रग तस्कर, विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम

ड्रग तस्कर, विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम
Published on

ड्रग्ज तस्कर, विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम
धरपकडीसह प्रतिबंधात्मक ताबा, मालमत्ता जप्ती सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः नेस्को प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विशेषतः एक्स्टॅसी, एलएसडी, कोकेन आदी पार्टी ड्रगची तस्करी, विक्री, वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे.
या विशेष कारवाईत अटकेसह वर्षभराचा प्रतिबंधात्मक ताबा, हद्दपारी, अमली पदार्थांच्या विक्रीतून उभारलेल्या मालमत्तांची जप्ती, अवैध बांधकामांचे पाडकाम, मोक्काचे हत्यार उपसले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित कॉन्सर्टमध्ये एक्स्टॅसी या पार्टी ड्रगसह मद्याच्या अतिसेवनामुळे दक्षिण मुंबईतील नामांकित महाविद्यालयात एमबीए शिकणाऱ्या दिल्ली, लखनौ येथील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासात या आणि शहरात आधी पार पडलेल्या अनेक टेक्नो म्युझिकल कॉन्सर्टमध्ये मुक्तपणे पार्टी ड्रगची विक्री, सेवन घडल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. तसेच या निमित्ताने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले.
या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त, सह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त स्तरावर अधिकाऱ्यांच्या विशेष बैठका पार पडल्या. त्यात पार्टी ड्रग विकणाऱ्यांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याच्या सूचना सुटल्या.
त्या पार्श्वभूमीवर शहरात अमली पदार्थ विकणाऱ्यांची धरपकड सुरू झाली. तपासावर असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा अर्थात मोक्कानुसार गुन्हा दाखल करणे शक्य आहे का, याचा अभ्यास किंवा कायदेशील सल्ला घेण्यास सुरुवात झाली आहे. सराईत विक्रेते तस्करांना महानगर प्रदेशातून हद्दपारी, त्यांच्या मालमत्तांची जप्ती आदी कायदेशीर कारवायाही सुरू झाल्या आहेत.

नेस्कोनंतरच्या कारवाया
- १५ एप्रिल-अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने साकीनाका येथे छापा घालून २०० एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली. त्याने कोणाकोणाला या उपक्या पुरवल्या, हा साठा कोणाकडून मिळवला याबाबत तपास सुरू आहे.
- १६ एप्रिल ः अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी खार परिसरात संशयास्पदरीत्या घुटमळणाऱ्या नायजेरियन तरुणास अटक केली. त्याच्याकडून २१३ ग्रॅम कोकेन आणि ४५ एक्स्टॅसी गोळ्या जप्त करण्यात आल्या.

हद्दपारी, मालमत्तेवर बुलडोझर
अमली पदार्थ तस्करी, विक्रीसोबत अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या मोहम्मद तसवर यासीन कुरेशी उर्फ तसू (४८) यास विक्रोळी पोलिसांनी तब्बल दीड वर्षे मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातून हद्दपार केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने अमली पदार्थ विक्रीतून आणि अन्य गुन्ह्यातून विक्रोळी परिसरात विकत घेतलेली मालमत्ता, अवैधरीत्या बांधलेले गाळे पाठपुरावा करून म्हाडाकडून जमीनदोस्त करून घेतले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, उपआयुक्त हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com