

अवयवदानाबाबत जागरूकतेची गरज
मुंबईत ८३७ रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून, अवयवदानाबाबत जनजागृतीची तातडीची गरज असल्याचे समोर आले आहे.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या माहितीनुसार, शहरात सध्या किमान ८३७ रुग्ण यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्षात ही संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे. कारण अनेक रुग्ण माहितीच्या अभावामुळे किंवा उपचारांचा मोठा खर्च परवडत नसल्यामुळे नोंदणीच करीत नाहीत. ११ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या जागतिक यकृत दिनाच्या पार्श्वभूमीवर ही गंभीर बाब पुढे आली आहे. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती झाली असून, यशाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे विविध कारणांनी यकृत निकामी झालेल्या रुग्णांचा आत्मविश्वास वाढून ते प्रत्यारोपणासाठी पुढे येत आहेत. मात्र उपलब्ध दात्यांची संख्या अत्यल्प असल्याने प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरात अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची मोठी यादी असून, त्या तुलनेत मेंदूमृत दात्यांकडून होणारे अवयवदान अत्यंत कमी आहे.
...
खर्च परवडत नसल्यामुळे...
अनेक रुग्णांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा मोठा खर्च परवडत नसल्यामुळे ते नोंदणी करीत नाहीत, तर काहींना या प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एक व्यक्ती अवयवदान करून अनेकांना जीवनदान देऊ शकते; मात्र यासाठी समाजातील सहभाग वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
...
नातेवाइकांमध्ये आशा
‘‘यकृत प्रत्यारोपण यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये आशा निर्माण झाली आहे; मात्र अवयवदानाबाबत जागरूकता आणि दात्यांची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे,’’ असे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.