

पाच हजार ‘एक्स्टॅसी’ गोळ्या जप्त
टिटवाळ्यातून वितरक महिलेसह दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः नेस्को येथील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने टिटवाळ्यात मोठी कारवाई केली. एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या अमली पदार्थ वितरक महिलेच्या घरी छापा घालत पथकाने पार्टी ड्रग एक्स्टॅसीच्या तब्बल पाच हजार गोळ्या जप्त केल्या. त्याची किंमत सहा कोटींहून अधिक असून, इतक्या मोठ्या प्रमाणात या गोळ्या जप्त होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जाते.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक अनिल ढोले आणि सहकाऱ्यांनी १५ एप्रिलला साकीनाका येथे छापा घालत इरफान अली अन्सारी या तरुणास अटक केली. त्याच्याकडे एक्स्टॅसीच्या २०० गोळ्या सापडल्या होत्या. याबाबतच्या चौकशीत ए. पॉल नामक महिलेचे तसेच तिच्याकडून इरफानपर्यंत एक्स्टॅसी गोळ्या पोहोचवणाऱ्या सुफियानचे नाव पुढे आले. त्यानुसार सुफियानला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून पॉलचा ठावठिकाणा घेत टिटवाळ्यात छापा घातला. साकीनाका येथील इरफान आणि पॉल यांची ओळख कारागृहात झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पथकाला मिळाली. त्याची खातरजमा केली जात आहे.
---
बार डान्सर ते ड्रग्ज वितरक
पॉलच्या घरात पिवळ्या, निळ्या, जांभळी, राखाडी अशा विविध रंगांतील एक्स्टॅसी गोळ्यांचा साठा सापडला. त्यासोबत चार मोबाईल आणि सात ते आठ सिम कार्ड सापडली. काही वर्षांपर्यंत बार डान्सर म्हणून काम करणारी पॉल गेल्या काही वर्षांत पार्टी ड्रग्ज वितरक, पुरवठादार बनल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले. तिने हा साठा कोणाकडून, कुठल्या मार्गाने मिळवला, कोणाकोणाला विकला, याबाबत चौकशी सुरू आहे.
-----
अटक टाळण्यासाठी खबरदारी
पॉल दोन महिन्यांपूर्वीच कल्याणहून टिटवाळ्यातील भाड्याच्या घरात स्थलांतरित झाली होती. अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात उतरल्यानंतर अटक टाळण्यासाठी तिने ठाणे जिल्ह्यात भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य केले. ती ठरावीक कालावधीनंतर घर बदलत असे. अगदी विश्वासातील व्यक्तींना ती एक्स्टॅसी पुरवत असे.
----
मर्सिडीज, ऑडी अन् बरेच काही
वनराई पोलिस, अमली पदार्थ विरोधी पथकाने पॉलच्या घरातून जप्त केलेल्या एक्स्टॅसी गोळ्यांवर महाराष्ट्राच्या नकाशासह मर्सिडीज बेंझ, ऑडी, ॲपल अशा विविध ब्रँडचे बोधचिन्ह कोरलेले आढळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.