

महारेराकडून वर्षभरात १० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी
४,२०४ नवीन प्रकल्पांचा समावेश; मुंबईसह एमएमआरमध्ये सर्वाधिक ५,४९४ प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : घर खरेदीदारांच्या हितसंबंधांची काळजी घेतानाचे बाजारात पुरेसा गृहसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी महारेरा प्राधिकरणाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल १० हजार ३७९ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ४,२०४ नवीन प्रकल्प असून, २,४८८ प्रकल्पांमधील सुधारणाना मंजुरी दिली आहे, तर जुन्या प्रकल्पांबाबत विकसकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार ३,६८७ गृहनिर्माण प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्वाधिक ५,४९४ प्रकल्पांचा समावेश आहे.
सध्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांकडून स्वमालकीचे घर खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बाजारात पुरेसा घरांचा साठा उपलब्ध असेल, तरच किमती नियंत्रणात राहू शकतील. त्यामुळे महारेराने नियमाचे काटेकोर पालन करत जास्तीत जास्त घरांना मंजुरी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार घर खरेदीदारांच्या हितसंबंधांची काळजी घेत, स्थावर संपदा क्षेत्रातील पारदर्शकता आणि गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमनाची आपली वचनबद्धता कायम ठेवत वर्षभरात १० हजारहून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून मंजुरी घेताना सादर केलेल्या प्रस्तावात काही दुरुस्त्या, बदल किंवा वाढ करण्यात आली असल्यास या सर्व ‘सुधारणा’ अंतर्गत येणाऱ्या बाबी महारेराकडून वेळोवेळी नियमित करून घेणे अनिवार्य आहे. शिवाय महारेराकडे नोंदणी करताना विकसकांना प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रकल्प पूर्ततेची निश्चित तारीख द्यावी लागते. प्रकल्पाला काही कारणाने उशीर झाल्यास अशा वेळी संबंधित विकसकांना महारेराकडून मुदतवाढ घ्यावी लागते.
मुंबई महाप्रदेश (एमएमआर) - एकूण ५,४९४ प्रकल्पांना मंजुरी
- ठाणे -१,७१४
- मुंबई उपनगर - १,६९६
- रायगड - ९३९
- पालघर - ५६८
- मुंबई शहर - ३७५
- इतर - २०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.