ठाण्यात साठा, मुंबईत विक्री?

ठाण्यात साठा, मुंबईत विक्री?
Published on

ठाण्यात साठा, मुंबईत विक्री!
नेस्को, टिटवाळा प्रकरणातून नवे समीकरण उघड
मुंबई, ता. २० ः नेस्को कॉन्सर्टनंतर मुंबई गुन्हे शाखेने टिटवाळ्यात केलेल्या कारवाईनंतर अमली पदार्थांच्या रॅकेटचा ठाणे जिल्ह्यात साठा, मुंबईत विक्री असे नवे समीकरण तयार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नेस्को प्रकरणात अटक झालेले प्रतीक पांडे, शुभ अग्रवाल, आनंद पटेल, आयुष साहित्य, विनीत गेरेलानी हे पाच आरोपी कल्याण, उल्हासनगरचे रहिवासी आहेत. विनीतच्या घरातून एक्स्टॅसीचा साठा सापडला. कल्याण, उल्हासनगर येथूनच एक्स्टॅसीच्या गोळ्या नेस्को केंद्रात पोचल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ अमलीपदार्थ विरोधी पथकाने टिटवाळ्यात अश्विनी पॉल नामक बारबालाच्या घरातून सहा कोटी रुपयांच्या पाच हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त झाल्या. काही दिवसांपूर्वी तिने त्यातील २०० गोळ्या साकीनाका येथे पाठवल्या होत्या, अशी माहिती पुढे आली. या पार्श्वभूमीवर तस्करांनी अमली पदार्थांची मोठी खेप थेट मुंबईत न आणता वेशीवरील शहरात सुरक्षित ठेवून, मागणीप्रमाणे साठा मुंबईत पाठवण्याची रणनीती अवलंबल्याचे निरीक्षण पोलिसांकडून नोंदवण्यात आले.
---
थेट मुंबई का नाही?
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिस ठाण्यांची संख्या शेजारील शहरांच्या तुलनेने अधिक आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक, महसूल गुप्तचर संचालनालय, कस्टम आदी यंत्रणांचे मुंबईतील हालचालींवर काटेकोर लक्ष असते. त्यामुळे मोठी खेप मुंबईत आणणे जिकिरीचे ठरते. त्याऐवजी ठाणे, नाशिक आदी मुंबईपासून जवळ असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात साठा दडवून तो मागणीप्रमाणे वितरित करणे तुलनेने सोयीचे पडते.
-----
ठाणे पोलिसांकडून अमलीपदार्थ उत्पादक ते किरकोळ विक्रीच्या संघटित साखळी विरोधात कारवाया सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत इतर राज्यांतही कारवाया करण्यात ठाणे पोलिसांना यश आले; मात्र नव्या कलानुसार अधिक तीव्र कारवाई केली जाईल.
- आशुतोष डुंबरे, आयुक्त, ठाणे पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com