

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुलभ
आता ‘ओएनडीसी’ प्लॅटफॉर्मवर मिळणार बेस्ट बसचे तिकीट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (बेस्ट) आपल्या प्रवाशांना डिजिटल युगाची नवी भेट दिली आहे. बेस्ट उपक्रमाने आता आपले तिकीट बुकिंग ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ओएनडीसी) प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टचे तिकीट काढण्यासाठी वेगळे बेस्ट ॲप डाऊनलोड करण्याची गरज उरणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो, बेस्ट आणि रेल्वे या तिन्ही प्रमुख वाहतूक यंत्रणांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या दिशेने टाकलले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या सुविधेमुळे मुंबईकरांचा सार्वजनिक प्रवास अधिक वेगवान आणि कॅशलेस होणार आहे.
सध्या बेस्टचे साधारण १५ ते १६ टक्के प्रवासी डिजिटल तिकिटिंगचा वापर करतात. ओएनडीसीशी जोडले गेल्यामुळे हा आकडा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. डिजिटल तिकिटिंगमुळे अनेक फायदे आहेत. प्रवासी आता त्यांच्या फोनमध्ये आधीपासून असलेल्या गुगल पे, फोन पे, पेटीएम, व्हाॅट्सॲप, उबर, रॅपिडो किंवा रेड बस यांसारख्या २८ हून अधिक अॅप्सद्वारे थेट बेस्टचा क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी करू शकतील. मोबाईलमध्ये जागा व्यापणारे स्वतंत्र अॅप डाऊनलोड न करता उपलब्ध अॅप्सवरूनच तिकीट प्रक्रिया पूर्ण करता येईल.
बसमध्ये चढल्यानंतर केवळ मोबाईलमधील उपलब्ध अॅप उघडून काही सेकंदांत तिकीट काढता येईल. यामुळे वाहकांकडील सुट्ट्या पैशांची समस्याही दूर होईल. ओएनडीसी हा केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला बळ देण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी बेस्टने हे पाऊल उचलले आहे.
देशातील २६ शहरांमध्ये कार्यरत
सध्या ओएनडीसी ट्रांझिट सेवा देशातील २६ शहरांमध्ये कार्यरत असून, आठ मेट्रो प्रणाली आणि अनेक परिवहन संस्था या नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. आता मुंबईची ‘बेस्ट’ या ताफ्यात सहभागी झाल्यामुळे लाखो प्रवाशांना याचा थेट लाभ मिळणार आहे. सध्या प्रवाशांना ‘वन तिकीट’ अॅपद्वारे ही सुविधा मिळत असून, लवकरच ती सर्व लोकप्रिय पेमेंट अॅप्सवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.