केईएम रुग्णालयात अत्याधुनिक थ्रीडी मशीन

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक थ्रीडी मशीन
Published on

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक थ्रीडी मशीन
स्तन कर्करोग निदान होणार अधिक जलद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिका अंतर्गत सेठ गो. स. वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रुग्णालय येथे अत्याधुनिक थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी मशीन सुरू करण्यात आले आहे. ही मशीन एका फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णालयाला उपलब्ध झाली असून, स्तन कर्करोगाचे लवकर व अचूक निदान करण्यास मोठी मदत होणार आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे स्तन तपासणी अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. पारंपरिक २ डी मॅमोग्राफीच्या तुलनेत ही मशीन अधिक अचूक निदान देऊ शकते. स्तन कर्करोगाच्या अगदी प्राथमिक अवस्थेतही गाठींचा शोध घेणे शक्य होणार असून, त्यामुळे उपचार लवकर सुरू करून रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.
या मशीनचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किरणोत्सर्ग कमी प्रमाणात होतो. त्यामुळे रुग्णांना तपासणीदरम्यान कमी त्रास होतो. तसेच बायोप्सी प्रक्रिया सुमारे १५ मिनिटांत पूर्ण करता येते. याशिवाय ‘एन्हान्स्ड डिजिटल मॅमोग्राफी’मुळे तरुण महिलांमधील स्तन कर्करोगाचे निदान अधिक प्रभावीपणे करता येणार असून, काही प्रकरणांमध्ये एमआरआयची गरजही कमी होणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे रेडिओलॉजिस्टना निदान करताना अधिक अचूकता साधता येणार आहे.

दर्जेदार सेवा मिळणार
तज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांनंतर प्रत्येक महिलांनी नियमित स्तन तपासणी करणे आवश्यक आहे. ज्यांच्या कुटुंबात स्तन कर्करोगाचा इतिहास आहे, त्यांनी ३५ वर्षांपासूनच दरवर्षी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयात स्तन कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असून, २००९ पासून या क्षेत्रात विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या नव्या मशीनमुळे रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार सेवा मिळणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com