

दरमहा १५० त्वचादानाची गरज
भाजलेल्या रुग्णांसाठी दानाची वाढती गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील नॅशनल बर्न्स सेंटर (एनबीसी)ने त्वचादानाच्या अत्यल्प प्रमाणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दरमहा सुमारे १५० त्वचादानाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ २० दान मिळत असल्याने गंभीर भाजलेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत असून त्वचादान वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एनबीसीचे संचालक व प्लॅस्टिक सर्जन डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले, की या तुटवड्याचे प्रमुख कारण म्हणजे जनजागृतीचा अभाव. अंदाजे १० पैकी फक्त एका व्यक्तीला त्वचादानाबाबत माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील त्वचापेढी गरजेपैकी केवळ २५ टक्केच साठा करू शकतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सुमारे ७० टक्के भाजलेले रुग्ण हे १५ ते ३५ वयोगटातील आहेत. वेळेत त्वचा प्रत्यारोपण (ग्राफ्ट) न मिळाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका वाढतो आणि कुटुंबांवर आर्थिक तसेच मानसिक ताण निर्माण होतो. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत त्वचादान करता येते; मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी आणि कुटुंबाची संमती आवश्यक असते.
दरम्यान, त्वचादानाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. त्वचादान केल्याने शरीर विद्रूप होते किंवा प्रक्रिया गुंतागुंतीची असते, असे समज प्रचलित आहेत; मात्र तज्ज्ञांच्या मते हे सर्व गैरसमज असून योग्य माहिती आणि जनजागृतीमुळे अधिक नागरिक पुढे येऊ शकतात.
तज्ज्ञांचे आवाहन
भाजलेल्या घटनेत बरे झालेल्या विराज ठाकूर यांनी त्वचादानामुळे आपला जीव वाचल्याचे सांगितले. केमिकल अपघातात गंभीर भाजल्यानंतर त्यांच्यावर त्वचा प्रत्यारोपण करण्यात आले होते. भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्वचादान अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.