

ड्रग्जविरोधात धक्कातंत्र
गुन्हेगारांना गाफील ठेवत अटक करण्याचे नियोजन; पोलिस सतर्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः नेस्को आणि टिटवाळा प्रकरणांनी मुंबईसह महानगर प्रदेशातील पोलिसांची झोप उडवली आहे. एकीकडे आरोपींचे परदेशी संधान आणि देशभर पसरलेली व्याप्ती लक्षात घेता नैसर्गिक, रासायनिक अमली पदार्थ तस्करी, विक्रीची संघटित साखळी उद्ध्वस्त करण्याचे आव्हान आहे. तर दुसरीकडे तरुणांमधील ड्रग्जची, विशेषतः पार्टी ड्रग्जची वाढती चटक, व्यसन या सामाजिक समस्येचे अप्रत्यक्ष येणाऱ्या जबाबदारीचे ओझे आहे.
या पार्श्वभूमीवर तूर्तास मुंबई पोलिसांनी काम, नाक, डोळे सताड उघडे ठेवून धडक कारवाया, प्रतिबंधक उपाय आणि गुन्हेगारांना गाफील ठेवत अटक करण्याचे धक्कातंत्र अवलंबिले आहे.
देशभर व्याप्ती
नेस्को आणि टिटवाळा या प्रकरणांत पोलिसांनी सहा हजारांहून अधिक एक्स्टॅसी गोळ्यांच्या साठा जप्त केला. टिटवाळा प्रकरणातील आरोपींनी २५ हजार गोळ्यांचा म्हणजे ३० कोटींचा साठा परदेशातून मागवला. तो सुरक्षित उतरवून घेतला आणि त्यातील सुमारे २४ कोटींच्या गोळ्या विकून मोकळे झाले. विशेष म्हणजे यातील प्रमुख आरोपीने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यावर हे उपद्व्याप केल्याचे स्पष्ट झाले आहे. जामिनावर असताना हा साठा त्याने आपल्या बारबाला प्रेयसीसोबत मुंबई महानगर प्रदेशासह संपूर्ण देशात बिनबोभाट विकला.
तरुणांकडून मागणी वाढली
एक्स्टॅसीसह अन्य पार्टी ड्रग्ज हे तरुण, नवतरुणांच्या आनंद साजरा करण्याचे परिमाण बनले आहे. कॉन्सर्ट, पार्टी, आफ्टर पार्टी ही एक्स्टॅसी, वीड, कोकेन, एलएसडी इत्यादी पार्टी ड्रग्जशिवाय शक्य नाही, हे समीकरण तरुणांमध्ये रुजते आहे. बाकीचे घेतात मग मी का नाही, नाही घेतले तर बाकीचे चिडवतील, या भावनेतून तरुणांमधील पार्टी ड्रग्जचे सेवन वेगाने वाढते आहे. अगदी सहजपणे गंध, चवरहित रासायनिक अमली पदार्थांचे सेवन तरुणांकडून सुरू आहे. त्यामुळे या अमली पदार्थांची मागणी मुंबईसह देशात वाढल्याने आमिर सय्यद, अश्विनी पॉल, आयुष साहित्य (टिटवाळा, नेस्को प्रकरणातील आरोपी) आदी आरोपींनी अधिकाधिक साठा केल्याचे वास्तव तपासातून समोर आले.
अनेक टोळ्या
दोन्ही प्रकरणांच्या तपासातून एक्स्टॅसीसह अन्य पार्टी ड्रग्ज विकणाऱ्या अनेक टोळ्या असल्याचे वास्तवही उघड झाले. या गुन्ह्यांतील किरकोळ विक्री करणारे एकाच वेळेस अनेक वितरक, साठेबाजांच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली.
नाकाबंदी कारवाई
धडक कारवायांसोबत पोलिसांनी अमली पदार्थ शहरात येऊच नयेत, आलेच तरी त्यांची विक्री होऊ नये या उद्देशाने अनपेक्षित ठिकाणी, अनपेक्षित दिवशी व वेळी नाकाबंदी कारवाई सुरू केली आहे. पूर्वी नाकाबंदीची वेळ, दिवस, ठिकाण ठरलेले असे. त्यामुळे ती टाळून गुन्हेगार संचार करीत असत. मात्र अनपेक्षित कारवाई सुरू केल्याने संचारावर चाप बसेल, असा विश्वास पोलिसांना आहे.
खबऱ्यांचे जाळे
अमली पदार्थ तस्करी, विक्रीचे गुन्हे नोंद असलेल्या प्रत्येक आरोपीच्या हालचाली अधिक तीव्रतेने तपासल्या जात आहेत. खबऱ्यांचे जाळे अधिक समृद्ध करून अमली पदार्थ उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंतच्या संघटित साखळीशी संबंधित अधिकाधिक गोपनीय माहिती संग्रहित करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
साध्या वेशातील पोलिसांचा वावर
यापुढे आयोजकांना आयत्यावेळी, घाईघाईत कॉन्सर्टसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे खुद्द पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबत आता कॉन्सर्टमध्ये प्रत्येक टप्प्यावर गणवेशधारी, साध्या वेशातील पोलिसांचा वावर असेल. नेस्को प्रकरणाच्या पुढल्याच आठवड्यात शिवडी येथे आयोजित केल्विन हॅरिस कॉन्सर्टमध्ये त्याची प्रचीती कॉन्सर्टप्रेमींनी घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.