

एकाचा मृत्यू; आठ जखमी
भांडुपमध्ये लग्नातील वादानंतर विचित्र घटना
मुंबई, ता. २४ ः भांडुपमध्ये एका विचित्र घटनेत नऊ तरुण जखमी झाले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एका लग्नसमारंभात सहभागी तरुणीची छेड काढल्यावरून दोन समूहांत वाद झाला. हाणामारीसाठी पाठलाग झाला. पळता-पळता सारे शेजारील निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्यावर (बेसमेंट) पोहोचले तेव्हा हा प्रकार घडला. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काका पेट्रोलपंप परिसरातील श्रद्धा कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली.
पोलिस उपआयुक्त हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना स्थानिक रहिवासी, अग्निशमन दलाच्या मदतीने खड्ड्याबाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या भालचंद्र फल्ले (२५) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात श्रद्धा कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. तरुणीसह मृत भालचंद्र याचे वडील गणेश यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार घटना घडलेल्या इमारतीशेजारी लग्नसमारंभात एका तरुणाने तिच्याकडे पाहत हात हलवून ‘टाटा बाय बाय’ केले. त्यावरून वाद झाला आणि त्या तरुणाचा पाठलाग केला गेला.
पाठलाग करता करता सर्व बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत शिरले. त्यापैकी एक जण तोल जाऊन बेसमेंटमधील अर्धवट बांधलेल्या टाकीत पडला. ही टाकी सुमारे २० ते ३० फूट खोल होती. सोबतचे पाच जण आणि तेथेच वास्तव्य करणाऱ्यांपैकी तीन बांधकाम मजुरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. या टाकीच्या तोंडावर लाकडी फळ्या आणि पत्रे आच्छादण्यात आले होते. त्यावर उभे राहून आठ जणांनी खाली पडलेल्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आच्छादन तकलादू होते. आठ जणांचा भार पेलू न शकल्याने ते तुटले आणि सारे त्या खड्ड्यात पडले, अशी माहिती उपआयुक्त राजपूत यांनी दिली. यात अनिकेत पाटील (२१), श्रेयस सुर्वे (२५), ऋषिकेश कदम (२५), आदित्य आहेर (२५), संकेत जुवाटकर (२५) यांच्यासह मजूर जयदत्त शहा (२१), अंकित रॉय (१९), मजूर पासवान (२५) हे जखमी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.