

केईएम नामांतर वादात
डॉक्टर, माजी विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया; तज्ज्ञांमध्ये मतभेद
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावर सध्या विविध स्तरांवर चर्चा रंगली असून, या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘केईएम’ हे संक्षिप्त नाव कायम ठेवून पूर्ण नावात बदल करण्याचा प्रस्ताव असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मतमतांतरे दिसून येत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, ‘केईएम’ हे नाव जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, डॉक्टरांची ओळख आणि आंतरराष्ट्रीय मान्यता याच नावाशी जोडलेली आहे. त्यामुळे पूर्ण नाव बदलल्यास विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि माजी विद्यार्थ्यांना व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या मते ‘केईएम’ हे नाव ब्रिटिश वसाहतवादी काळाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक शहरे व संस्थांची नावे बदलून स्थानिक संस्कृती आणि महापुरुषांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे नामांतर योग्य ठरू शकते, असे मतही व्यक्त होत आहे.
इतिहासाची पार्श्वभूमी
ब्रिटिश काळात जे. जे. रुग्णालयात भारतीयांना उपचार व शिक्षणासाठी प्रवेश नव्हता. त्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी केईएम रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे हे नाव रुग्णांच्या स्मृतीत आणि लोकमानसात खोलवर रुजले आहे, असे मत माजी अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केले.
त्या काळात भारतीय डॉक्टरांना प्रवेश नव्हता. देशप्रेमातून जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली. ‘केईएम’ हे नाव तत्कालीन राजाच्या स्मरणार्थ देण्यात आले. त्यामुळे नाव बदलणे योग्य आहे.
- डॉ. हेमन कुलकर्णी,
माजी विद्यार्थी
पूर्ण नाव बदलले तरी ‘केईएम’ हे संक्षिप्त नाव कायम राहणार आहे. इतर शहरांतही केईएम रुग्णालये आहेत. त्यामुळे नाव बदलाचा फारसा परिणाम होणार नाही.
- डॉ. दिलीप राणा, माजी विद्यार्थी
हे रुग्णालय ब्रिटिश काळात मिळालेल्या निधीतून उभे राहिले आणि भारतीयांनी चालवले. १०० वर्षांपूर्वीच्या त्या विचाराचा सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे नाव बदलणे योग्य नाही.
- डॉ. उदय ठाणावाला,
माजी विद्यार्थी
‘केईएम’ हे नाव जगभर ओळखलं जातं; ते बदलल्यास विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आंतरराष्ट्रीय ओळखीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- डॉ. अविनाश सुपे,
माजी अधिष्ठाता , केईएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.