शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर ताण

शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर ताण
Published on

शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर ताण
कार्यशाळेत मांडल्या समस्या; शिक्षणापेक्षा इतर कामेच जास्त
मुंबई, ता. २७ ः शैक्षणिक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना त्यांच्या कामापेक्षा इतर सर्वच कामे लादली जातात. त्यामुळे त्यांच्यावर एकीकडे शैक्षणिक आणि दुसरीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे राज्यातील असंख्य शिक्षक हे मानसिक दडपणाखाली येत असून, त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचने मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावरील कार्यशाळेत शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न राज्यभरातच ऐरणीवर आलेला असताना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते आणि शिक्षकांवर नको त्या कामांची सक्ती केली जाते. जनगणना, एसआयआर, बीएओ आदी कामकाजासाठी शिक्षक हजर न राहिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापर्यंतच्या कारवायांचा केल्या जातात. अशा स्थितीत शिक्षकांचे मूळ अध्ययन, अध्यापन, गुणवत्ता विकास, मूल्यांकन आदी कामे बाजूला राहत असल्याने त्याकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची गरजही शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. शिक्षकांच्या मानसिक आरोग्यासाठी मुंबईतील पहिली कार्यशाळा राज्यात येत्या काळात शिक्षकांसाठी मोठी वरदान ठरणार असल्याचे पुणे विद्यार्थी गृहाचे कुलसचिव दिनेश मिसाळ यांनी सांगितले.

शिक्षक शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि विद्यार्थी विकास यांचा समन्वय साधून काम करत असतो, परंतु शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या शाळाबाह्य कामकाजांमुळे शिक्षक स्वतः अतिशय त्रस्त झालेला आहे. शैक्षणिक प्रगती करायची आहे, पण त्यासाठी शिक्षक मानसिक आरोग्य लक्षात घेणे आवश्यक आहे.
- शीतल प्रभू, ‍शिक्षिका, विद्याभवन प्राथमिक शाळा.

राज्यातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. शिक्षक म्हणून त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहिले तरच तो विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानार्जन करू शकेल. यामुळे त्यांना शिक्षण विकास मंचच्या कार्यशाळेतून एक मोठा दिलासा दिला.
- ज्योती निचित, शिक्षिका, समूपदेशक, श्रीगौरीदत्त विद्यालय, ‍शीव

‍शिक्षण विकास मंचच्या कार्यशाळेने राज्यव्यापी कार्यक्रम आखले पाहिजेत. शिक्षक आनंदी वातावरणात काम करण्यासाठी ही कार्यशाळा आवश्यक आहे. यात शिक्षकांसोबत विद्यार्थीही असतील, तर अधिक लाभ होईल.
- ममता सोनवणे, शिक्षिका, चिकित्सक विद्यालय, गिरगाव

शिक्षकांचे मानसिक आरोग्य हे समाज आणि देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक शिक्षकाला येणाऱ्या अडचणींवर मानसिक उपचार कसे करायचे, हे शिक्षण विकास मंचच्या पहिल्या कार्यशाळेत खूप चांगल्या पद्धतीने कृतीद्वारे शिकता आले. याचा अधिकाधिक शिक्षकांना लाभ मिळावा.
- प्रणव शेंबेकर, शिक्षक, एसएनडीटी कनिष्ठ महाविद्यालय

शिक्षक हा देशाचे भविष्य घडवण्याचे काम करतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे काम करतो. शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांना अनेक विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या, कामे करावी लागतात. अनके कामांमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. यासाठी आमच्याकडे घेतलेली कार्यशाळा एक मोठे पाऊल ठरेल.
- राजेंद्र बोऱ्हाडे, कार्याध्यक्ष पुणे विद्यार्थी गृह, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com