

स्त्री-शिक्षणाचा वारसा धोक्यात
गिरगावातील १७८ वर्षांच्या शाळेची अस्तित्वासाठी लढाई
मुंबई, ता. २७ : मुंबईच्या गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील १७८ वर्षांचा देदीप्यमान इतिहास असलेली ‘द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ही मराठी माध्यमाची शाळा सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. एकेकाळी मुंबईतील स्त्री- शिक्षणाचा भक्कम आधारस्तंभ असलेली ही शाळा आज सामाजिक बदल आणि सरकारी धोरणांमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
१८४८ साली दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकरशेट, न्यायमूर्ती के. टी. तेलंग आणि रावबहादूर नारायण दीनानाथ वेलकर यांसारख्या महान समाजसुधारकांनी या संस्थेची स्थापना केली होती. स्त्रियांनी शिक्षित आणि स्वावलंबी व्हावे, हा त्यामागचा उदात्त उद्देश होता. आज याच शाळेचे वर्ग रिकामे असून, प्रयोगशाळा शांत झाल्या आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा वृंदा भागवत यांनी सांगितले, की २०१८-१९ पर्यंत शाळेत सुमारे १,२०० विद्यार्थी होते. मात्र गिरगावातील मराठी कुटुंबे उपनगरांत स्थलांतरित झाल्याने विद्यार्थीसंख्या कमालीची घटली आहे. सध्या शाळेत केवळ ६८ विद्यार्थी उरले आहेत. यामुळे शिक्षकांची भरती रखडली असून, एकेकाळी २०-२५ शिक्षक असलेल्या शाळेत आता केवळ सात शिक्षक उरले आहेत. शासनाच्या ‘२० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक’ या धोरणामुळे ही संख्या अजून कमी होण्याची भीती आहे.
शाळेने काळानुरूप बदल करीत २०२२ मध्ये सहशिक्षण सुरू केले. २०१५मध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला. मराठी शाळा वाचवा अशा घोषणा दिल्या जातात, मात्र प्रत्यक्षात या शाळांना टिकवण्यासाठी प्रोत्साहनपर योजनांची गरज आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले.
१९२६मध्ये बांधलेली २० हजार चौरस फुटांची ही वास्तू आता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ट्रस्टी प्रकाश चिखलीकर यांनी सांगितले, की इमारतीच्या देखभालीसाठी मोठ्या निधीची गरज आहे. जगन्नाथ शंकरशेट यांचे खापरपणतू सुरेंद्र शंकरशेट (९३) आजही ही शाळा वाचवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या मते, या शाळा मुंबईचा जिवंत इतिहास असून, सरकारने यांना ‘हेरिटेज स्कूल’ म्हणून दर्जा द्यायला हवा.
ही केवळ इमारत नसून मुंबईच्या स्त्री-शिक्षणाचा १८० वर्षांचा जिवंत वारसा आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी शासनाच्या विशेष ‘हेरिटेज’ पाठबळाची नितांत गरज आहे.
- प्रकाश चिखलीकर, विश्वस्त
मराठी शाळा वाचवण्याच्या घोषणा कागदावर खूप होतात, पण प्रत्यक्षात लवचिक सरकारी धोरणांची आणि समाजाच्या मदतीची आवश्यकता आहे.
- वृंदा भागवत, अध्यक्षा
घटलेली पटसंख्या ही मोठी चिंता आहे. आम्ही सुट्ट्यांच्या काळातही संपूर्ण परिसर पिंजून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करतोय; मात्र मराठी कुटुंबांच्या स्थलांतराचा फटका शाळेला बसत आहे.
- शमिका आजगावकर, मुख्याध्यापिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.