

जनगणनेसाठी व्यापक प्रचार करा
जनजागृती करण्याचे डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश
मुंबई, ता. २७ : ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होणारी ‘जनगणना २०२७’ ही प्रक्रिया प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने सज्ज राहावे, जनगणनेमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रीडापटूंची मदत घेऊन व्यापक प्रसिद्धी करावी,’ असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी (ता. २७) दिले.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षात आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (शहर), अभिजित बांगर (प्रकल्प), डॉ. अविनाश ढाकणे (पूर्व उपनगरे) यांच्यासह सर्व सह आयुक्त, उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. डॉ. शर्मा म्हणाले की, ‘जनगणनेच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी विभागनिहाय नेमलेल्या चमूंनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेषतः १ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या ‘स्वगणना’ टप्प्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या माध्यमातून चित्रफिती (व्हिडिओ) तयार करून समाजमाध्यमांवर त्याचा प्रसार करावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक या राष्ट्रीय कार्यात उत्साहाने सहभागी होतील. प्रत्येक विभागाने आपापल्या क्षेत्रातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची आधीच वेळ घेऊन १ मे रोजी त्यांची माहिती भरून घ्यावी. यामुळे जनगणनेला सकारात्मक सुरुवात मिळेल.’ तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यावर प्रशासनाचा भर आहे. मुंबईकरांनी या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
महत्त्वाचे टप्पे
स्वगणना : १ मे २०२६ ते १५ मे २०२६.
घरयादी व घरगणना : १६ मे २०२६ ते १४ जून २०२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.