

मुदतवाढ देण्याची तयारी; पण मुजोरी केल्यास कारवाई
मराठीबाबत रिक्षाचालकांना सरनाईक यांचा इशारा
मुंबई, ता. २७ : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी ठरावीक मुदत द्यावी, ही अनेक संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि, मराठी भाषा शिकणारच नाही, अशी मुजोरी करणाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला. मंत्रालयात झालेल्या विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख आदी उपस्थित होते.
रोजगार निर्मिती हा राज्य सरकारचा प्रमुख उद्देश आहे; मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा, यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणे आवश्यक आहे. चालकांना मराठी शिकवण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. त्यात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या संस्थांचे तसेच साहित्यिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे, असे सरनाईक या वेळी म्हणाले.
दरम्यान, रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती उपक्रम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.
----
परिवहन आयुक्तालयात आज बैठक
अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत द्यावी, या संघटनांच्या मागणीबाबत उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.