भरधाव दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या
अपघातात तिघांचा मृत्यू
Published on

भरधाव दुचाकीच्या
अपघातात तिघांचा मृत्यू
मरीन ड्राइव्ह येथील दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मरीन ड्राइव्ह येथे घडली. हा अपघात इतका भीषण होता की, पादचारी ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीवरील तरुण व तरुणी जागीच ठार झाले. कृष्णा देसाई (वय १९), मुस्कान शेख (वय १८) आणि किशोर लामणे (वय ६२) अशी मृतांची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिस घटनेचा करीत आहेत.
कृष्णा मुलुंड येथील रहिवासी असून, तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्या हट्टापायी नुकतीच वडिलांनी त्यास नवी दुचाकी घेऊन दिली होती. रविवारी संध्याकाळी ५च्या सुमारास तो घरातून निघाला. मित्रांसोबत जेवण केल्यानंतर वडिलांकडून पेट्रोलसाठी पैसे घेतले आणि पहाटे ५च्या सुमारास तो मुस्कानला घेऊन मरीन ड्राइव्हवर आला. भरधाव वेगात पारशी जिमखाना चौकात येताच रस्ता ओलांडणाऱ्या लामणे यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यामुळे लामणे सुमारे शंभर फूट लांब फेकले गेले, तर मागे बसलेली मुस्कान हवेत उडून खाली पडली. धडकेमुळे दुचाकी अनियंत्रित झाल्याने कृष्णा रस्त्याकडेला उभ्या एका चारचाकी, तर दोन दुचाकींना धडकला आणि पडला. पहाटे मरीन ड्राइव्हवर व्यायामासाठी आलेल्यांनी या तिघांना जीटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत दुचाकीस्वार कृष्णाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मुलुंडच्या कृष्णाची कफ परेडच्या मुस्कानसोबत ओळख कशी झाली, रात्री ११ ते अपघात होईपर्यंत कृष्णाने काय केले, तो मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत होता का? या प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत.
-----
मुस्कानची दुचाकी बेपत्ता
लामणे हे गिरगाव येथे पत्नीसोबत वास्तव्य करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते मरीन ड्राइव्हवर व्यायामाला येतात, तर मृत तरुणी मुस्कान कफ परेडच्या गीतानगर येथील रहिवासी आहे. एका खासगी कंपनीत टेली कॉलर म्हणून ती नोकरी करते. पहाटे घरातून निघताना मुस्कानने वडिलांची दुचाकी सोबत घेतली होती. ती अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.
----
दुपारी पटली ओळख
अपघातात मृत झालेल्या कृष्णा आणि लामणे यांची लगेच ओळख पटली; मात्र मुस्कानची ओळख दुपारी दीडच्या सुमारास पटली. पहाटे ४च्या सुमारास घरातून मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या मुस्कानने स्वतःचा आणि वडिलांचा मोबाईल सोबत घेतला होता. अपघातात दोन्ही मोबाईल क्षतिग्रस्त झाले. पोलिसांनी त्यातील सिम कार्ड अन्य मोबाईलमध्ये टाकून तिची ओळख पटवली.
---
म्हणून दोनशेच रुपये दिले
दुचाकी घेऊन रात्री शहरभर फिरू नये, या हेतूनेच पेट्रोलसाठी दोनशेच रुपये दिल्याचे वडील देसाई यांनी पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com