

महापालिकेत ‘कॅथ लॅब’ घोटाळा?
३० वर्षांच्या ‘पीपीपी’ करारावरून रणकंदन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्डिओलॉजी विभाग आणि कॅथ लॅब सुरू करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय आणि कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. ‘एमएमसी’ कायद्याच्या कलम ९२ चा आधार घेऊन सुधार समिती दिलेल्या मंजुरीला विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. महापालिकेचे गटनेते अशरफ आझमी यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा ठराव तत्काळ रद्द करण्याची मागणी महापौरांकडे केली आहे.
पेरिफेरल रुग्णालयांच्या अंतर्गत ‘कोलॅबोरेशन हेल्थ मॉडेल’द्वारे १० ते ३० वर्षांसाठी कार्डिओलॉजी सेवांचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी एक कंत्राट प्रसिद्ध करण्यात आले होते. या प्रस्तावाला नुकतीच सुधार समितीने मंजुरी दिली; मात्र आझमी यांच्या मते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समितीची दिशाभूल करून ही मंजुरी मिळवली आहे. आझमी यांनी पत्रात काही मुद्दे उपस्थित केले असून, त्यानुसार हा करार खरेदी आणि व्यवस्थापनाशी संबंधित असल्याने कलम ६९ अंतर्गत स्थायी समितीची मंजुरी आवश्यक होती. सुधार समितीला कलम ९२ अंतर्गत असा ३० वर्षांचा लीज करार मंजूर करण्याचा अधिकारच नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कॅथ लॅब सुरू करताना तिथे कार्डियाक सर्जन किंवा ऑपरेशन थिएटरची उपलब्धता नसेल, तर आपत्कालीन स्थितीत रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती आझमी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सुधार समितीचा बेकायदा ठराव तत्काळ रद्द करावा, दिशाभूल करणारा प्रस्ताव मांडणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, सर्व ‘पीपीपी’ प्रकल्पांच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमावी, अशी मागणी आझमी यांनी केली.
महापालिकेत सध्या प्रशासकीय नियमांची अक्षरशः पायमल्ली सुरू आहे. जो प्रस्ताव आरोग्य विभागाच्या साहित्य खरेदीसाठी अपेक्षित होता, त्याच्या नावाखाली चक्क मुंबईच्या मोक्याच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याचे कारस्थान रचले जात आहे.
- किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या
महापालिकेच्या मौल्यवान जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न असून, कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवण्यात आली आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही हा लढा तीव्र करू.
- अशरफ आझमी, गटनेते, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.