

तांत्रिक बिघाडामुळे ‘रो-रो’ रद्द
तासभर प्रतीक्षेनंतर प्रवाशांचा रस्तामार्गे प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मुंबई ते मांडवादरम्यान सकाळी ८ वाजता सुटणारी ‘एमटूएम रो-रो’ फेरी मंगळवारी (ता. २८) तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. रोरो बोटीचे रॅम्प बंद न झाल्याने सेवा सुरूच होऊ शकली नाही आणि प्रवाशांचा जवळपास तासभर खोळंबा झाला.
नियोजित वेळेनुसार सर्व प्रवासी आपल्या वाहनांसह जहाजावर चढले. फेरी सुटण्याची वेळ उलटूनही हालचाल न झाल्याने सुरुवातीला नेमकी अडचण काय, याबाबत अनिश्चितता होती. काही वेळानंतर रॅम्पमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जहाजावरील अभियंत्यांनी दुरुस्तीचे प्रयत्न सुरू केले; मात्र ते निष्फळ ठरले. अखेर सकाळी सुमारे ९ वाजता फेरी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तांत्रिक कारणामुळे आजची सेवा शक्य नाही, असे सांगत प्रवाशांना आपल्या गाड्या बाहेर काढण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त करीत रस्तामार्गे मांडव्याकडे प्रस्थान केले. या अचानक निर्णयामुळे काही प्रवाशांचे नियोजन कोलमडले, तर काहींना पर्यायी प्रवासाचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागला.
तिकीट रक्कम परत
‘एमटूएम’ व्यवस्थापनाने सर्व प्रवाशांना तिकीट रक्कम परत देण्यात येणार आहे. त्यासाठी ई-मेलद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असेही स्पष्ट केले. रॅम्पमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, सेवा बुधवारी पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.