कैलास सत्यार्थी यांना जुरान गुणवत्ता पुरस्कार

कैलास सत्यार्थी यांना जुरान गुणवत्ता पुरस्कार
Published on

कैलास सत्यार्थी यांना जुरान गुणवत्ता पुरस्कार
समाजातील योगदानाबाबत सन्मान

मुंबई, ता. ७ :  उद्योगजगतामध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता, कार्यक्षमतेत सुधारणा आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी दिले जाणारे आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार (आयएमसी आरबीएनक्यूए २०२५) ट्रॉफी, जिंदल स्टेनलेस लिमिटेड, जीएआर वारोरा एनर्जी लि. आणि ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, अहमदाबाद यांना देण्यात आला.
विविध क्षेत्रातील संस्थांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजातील सुधारणा आणि उच्च दर्जाच्या कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून क्रिकेटपटू  सुनील गावस्कर, नोबेल शांतता पुरस्कारविजेते  कैलाश सत्यार्थी  उपस्थित होते. या वेळी पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष नीरज बजाज म्हणाले, की भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, उत्कृष्ट कामगिरी ही आता पर्याय राहिलेली नाही, तर ती अत्यावश्यक बनली आहे. गेल्या तीन दशकांपासून हे पुरस्कार आपल्या कंपन्यांना कार्यक्षमतेतून उत्कृष्टतेकडे नेणारा मार्ग दाखवत आहेत. उत्कृष्टता ही एखादी घटना नसून ती सवय आहे, आणि हाच दृष्टिकोन भारताच्या जागतिक नेतृत्वाला आकार देईल.
गुणवत्ता ही योगायोगाने मिळत नाही, तर ती शिस्तबद्ध प्रयत्न आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे निर्माण होते. आजच्या बदलत्या व्यावसायिक वातावरणात सातत्याने आणि शिस्तीने काम करण्याची क्षमता हीच यशाची गुरुकिल्ली ठरेल, असे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षा सुनीता रामनाथकर यांनी सांगितले.
समाजातील योगदानाबद्दल आयएमसी जुरान गुणवत्ता पदक २०२५ स्वीकारताना  कैलाश सत्यार्थी  म्हणाले, की करुणा केवळ तात्त्विक किंवा अमूर्त संकल्पना राहू नये. ती वास्तवातील समस्या सोडवणारी प्रभावी शक्ती बनली पाहिजे. खरी करुणा केवळ भावना नसून, ती जबाबदारी दाखवते. ती व्यवसाय, राजकारण आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत रुजली पाहिजे. गुणवत्तेत मानवी घटकाचा समावेश असणे आवश्यक आहे आणि समाजातील सर्वात वंचित घटकांच्या उन्नतीवर भर दिला पाहिजे. करुणा ही जागरूकता, जोड, संवेदना आणि कृती यांवर आधारित असून, तिचा जागतिक स्तरावर अवलंब होणे आवश्यक आहे.
सुनील गावस्कर  म्हणाले, गुणवत्ता केवळ उत्पादनांपुरती मर्यादित नसून ती करुणा आणि मानवतेचे प्रतिबिंब असते. उत्कृष्टतेचा पाया शिस्त, मूल्ये, सातत्य यावर उभा असतो. व्यवसाय दीर्घकाळ टिकतात ते सातत्यामुळे - जे उद्देश आणि प्रामाणिकतेने प्रेरित असते. सामान्य गोष्टी अचूकतेने केल्यानेच दीर्घकालीन यश मिळते, नशिबामुळे नाही. उद्योगातील उत्कृष्टता ही समाजाप्रती जबाबदारी आणि मूल्यांप्रती ठाम बांधिलकी यांसोबतच असली पाहिजे. स्कोअरबोर्डवर आकडे दिसतात; पण खरी परंपरा मूल्यांनीच घडते. प्रक्रियेचा आदर करा, सातत्य राखा आणि प्रामाणिकतेशी कधीही तडजोड करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com