बँक कर्जासाठी ‘नवघाणी’ शब्दाचा अडसर दूर होणार; बेस्ट या शब्दाला पर्यायी शब्द देणार

बँक कर्जासाठी ‘नवघाणी’ शब्दाचा अडसर दूर होणार; बेस्ट या शब्दाला पर्यायी शब्द देणार
Published on

बेस्टमध्ये कामगारांची भरती
​पावसाळ्यापूर्वी वीज विभागाला बळकटी; निम्म्या रिक्त जागांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात राबणाऱ्या नवघाणी कामगारांना बँकांकडून कर्ज मिळवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या कामगारांच्या पदासाठी वापरला जाणारा ‘नवघाणी’ हा शब्द बदलून त्याऐवजी नवा अर्थपूर्ण शब्द रूढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवण्यासाठी ६८६ नवघाणी कामगारांची तातडीने भरती करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंगळवारी (ता. ५) मंजुरी दिली.

बेस्टच्या विद्युत विभागात खोदकाम करणे, रस्त्याखालील केबलसाठी खड्डे खणणे आणि जड विद्युत उपकरणांची ने-आण करणे अशी कष्टाची कामे करणाऱ्यांना नवघाणी कामगार म्हणून ओळखले जाते. बँकिंग व्यवहार किंवा इतर अधिकृत ठिकाणी नवघाणी या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट होत नाही. पदनाम स्पष्ट नसल्याचे कारण देत अनेक बँका या कामगारांचे वैयक्तिक कर्ज नाकारतात. ही बाब लक्षात घेऊन बेस्ट समितीच्या बैठकीत या शब्दाऐवजी कामाचे स्वरूप स्पष्ट करणारा नवा शब्द वापरण्यावर चर्चा झाली.

मुंबई शहरात बेस्टचे १० लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत निवृत्तीचे प्रमाण वाढल्याने कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली आहे. सध्या विद्युत विभागात सुमारे १,२६० जागा रिक्त असून, दरवर्षी सरासरी १५० कामगार निवृत्त होतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी विलंब होण्याची भीती होती. ही निकड ओळखून ६८६ जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-------------------
नवघाणी कामगारांचे कार्य

रस्त्यावरील केबल फॉल्ट शोधण्यासाठी खोदकाम करणे, ट्रान्सफॉर्मरची ने-आण करणे यासाठी प्रामुख्याने माजी कामगारांची मुले कार्यरत असतात.
मॉन्सूनमध्ये तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाचा मोठा उपयोग होणार आहे. ​शहरातील वीज ग्राहकांना अखंडित सेवा मिळावी आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक अडचणी दूर व्हाव्यात, या दुहेरी उद्देशाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com