

विद्याविहार उड्डाणपुलासाठी १८९ झाडांचा बळी
पुनर्रोपणासाठी पालिकेचे दोन कोटी खर्च; आठ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : विद्याविहार पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात आता झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे. पुलाच्या जोडरस्त्यासाठी परिसरातील एकूण १८९ झाडे बाधित होणार असून, त्यांच्या तोडणी आणि पुनर्रोपणासाठी महापालिका एक कोटी ९९ लाख रुपये खर्च करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
विद्याविहार स्थानकावरील या उड्डाणपुलाचे काम ए. बी. इन्फ्राविल्ड लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी एकूण प्रकल्प खर्च ७६ कोटी १८ लाख ८० हजार ९८७ रुपये आहे.
कामाची मुदत पावसाळा वगळून १८ महिने आहे. सध्या पुलाचे काम प्रगतिपथावर असून जोडरस्त्यासाठी झाडे काढणे अनिवार्य झाले आहे. उद्यान विभागाच्या सर्वेक्षणानुसार, प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या १८९ झाडांपैकी ६५ झाडे पूर्णपणे तोडली जाणार आहेत. ७३ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. ५१ झाडे जशीच्या तशी सुरक्षित राखली जाणार आहेत. पर्यावरण संतुलनासाठी पालिकेने नियमानुसार १,९९० नवीन झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. या कामासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकीकडे मुंबईतील रस्ते आणि पुलांचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे; मात्र बाधित झाडांच्या बदल्यात मोठी वृक्षलागवड करून ही कसर भरून काढली जाईल, असा दावा पालिकेने केला आहे.
२८८ नवीन झाडे लावणार
उड्डाणपुलाच्या पश्चिम भागात रस्त्याच्या आराखड्यात काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे अतिरिक्त २४ झाडे बाधित झाली आहेत. यात १२ झाडे तोडली जाणार असून उर्वरित १२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात २८८ नवीन झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.