मोबाईल यूटीएस सहाय्यकांचा यशस्वी प्रयोग!

मोबाईल यूटीएस सहाय्यकांचा यशस्वी प्रयोग!
Published on

मोबाईल यूटीएस सहाय्यकांचा यशस्वी प्रयोग!
- ५.४० लाख प्रवाशांना थेट तिकीटसेवा; रांगा कमी, महसुलात ६.८९ कोटींची भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करून प्रवाशांना थेट त्यांच्या ठिकाणी जाऊन तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘मोबाईल यूटीएस सहाय्यक’ उपक्रमाला मध्य रेल्वेवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही महिन्यांत या सुविधेमुळे तब्बल ५.४० लाख प्रवाशांना थेट तिकीटसेवा मिळाली आहे.
मध्य रेल्वेने तिकीट खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी यूटीएस प्रणाली, रेलवन अ‍ॅपसह विविध डिजिटल उपायांसोबतच ही नवी सेवा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरू केली. सुरुवातीला तीन सहाय्यक तैनात करण्यात आले होते. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर जानेवारी २०२६ मध्ये आणखी पाच सहाय्यकांची भर घालण्यात आली. त्यामुळे सध्या एकूण आठ मोबाईल यूटीएस सहाय्यक कार्यरत आहेत.
३१ ऑक्टोबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत या सहाय्यकांनी एकूण ३.८६ लाख तिकिटे वितरित केली असून, त्यातून मध्य रेल्वेला ६.८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. केवळ एप्रिल महिन्यातच या सुविधेचा मोठा परिणाम दिसून आला. त्या महिन्यात १.७२ लाख प्रवाशांना सेवा देत १.२५ लाख तिकिटे जारी करण्यात आली आणि २.२२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
या सहाय्यकांकडे मोबाईल फोन आणि पोर्टेबल तिकीट प्रिंटिंग मशीन देण्यात येते. ते स्थानक परिसरातील कॉनकोर्स, होल्डिंग एरिया तसेच प्रवाशांच्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन तिकीट देतात. गरजेनुसार ते काउंटरवरूनही सेवा देतात. प्रवाशांना रोख तसेच डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी झाल्या असून, तिकीटविरहित प्रवासालाही आळा बसत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com