

घरांच्या किमती कमी करण्यासाठी म्हाडा खर्चाला कात्री लावणार
प्रशासकीय खर्च, आकस्मिक खर्च, नफा कमी करण्यासाठी प्रयत्न
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई, ठाणे, पुण्यातील म्हाडाची घरे महागडी असल्याची ओरड सर्वसामान्य अर्जदारांकडून केली जाते. त्या पार्श्वभूमीवर अव्वाच्या-सवा किमतीचा डाग पुसण्यासाठी म्हाडाने आता आपल्या वाढीव खर्चाला कात्री लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. घरांच्या किमती ठरवताना प्रशासकीय खर्च, आकस्मिक खर्च, नफा आदी बाबी गृहित धरून त्याचा किमतीत समावेश केला जातो; मात्र यापुढे निव्वळ झालेल्या खर्चाचाच किमतीत समावेश केला जाणार असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
म्हाडाकडून लाॅटरीत स्वत: बांधलेल्या घरांबरोबरच विकसकांकडून प्रीमियमच्या रूपाने मिळालेल्या घरांची विक्री केली जाते. त्यानुसार विकसकांकडून मिळालेल्या घरांच्या किमती रेडीरेकनर दराच्या ११० टक्के एवढ्या निश्चित केल्या जात असल्या तरी स्वत: उभारलेल्या घरांच्या किमती ठरवताना जागेची किमती, त्यावर झालेला वेगवेगळ्या प्रकारचा खर्च, बांधकाम खर्चाबरोबरच, पाच टक्के प्रशासकीय खर्च, पाच टक्के आकस्मिक खर्च, काम सुरू असताना होणाऱ्या दरवाढीच्या अनुषंगाने पाच टक्के वाढ आणि १० टक्के नफा गृहीत धरून किंमत काढली जाते. त्यामुळेच म्हाडाच्या घरांच्या किमती फुगत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष झालेला खर्चच यापुढे किमतीत धरला जाणार असून एमआयजी गटातील घरांच्या किमतीत लावला जाणारा १० टक्के नफाही कमी करता येईल का, याबाबत विचार सुरू असून सध्या काम सुरू असलेल्या इमारतींमधील आणि भविष्यात उभारल्या जाणाऱ्या इमारतीमधील घरांच्या किमती ठरवताना विचारात घेतला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सुमारे ८-१० टक्के एवढी घरांच्या किमतीत कपात होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
या घटकांना कात्री
- सध्या म्हाडाकडून प्रत्येक गृहप्रकल्पाच्या किमतीत पाच टक्के प्रशासकीय खर्च लावला जातो; मात्र एका कार्यालयाकडे किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे त्यांच्या टीमकडे एकापेक्षा अधिक प्रकल्प असतात. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पासाठी पाच टक्के प्रशासकीय खर्च न लावता प्रत्यक्ष त्याची विभागणी करून कमीत कमी कसा खर्च लावण्याचा विचार आहे.
- प्रशासकीय खर्चाप्रमाणेच प्रत्येक प्रकल्पासाठी पाच टक्के आकस्मिक खर्च लावला जातो; मात्र यापुढे असा खर्च झाला असेल तरच तो लावावा, याबाबत म्हाडा प्रयत्नशील असेल.
- अनेकदा सिमेंट, लोखंड आदी बाबींच्या किमतीत वाढ झाली नसतानाही किमती पाच टक्क्यांची वाढ गृहीत धरली जाते; मात्र अशी वाढ झाली तरच किमतीत त्याचा समावेश केला जाईल.
- घरे बांधताना कमी खर्च होईल, याकडे लक्ष देणार
बांधकामित घटकांचा भार कमी करणार
सध्या इमारत उभारताना जिना, गॅलरी, रॅम्प, पार्किंग, गार्डनसाठी जास्त जागा सोडली जाते. त्यामुळे याचा भार थेट कार्पेट रेशोवर पडत असल्याने एकूणच प्रतिचौरस फुटाचा खर्च वाढतो. त्यामुळे किंमत वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या या घटकांचा खर्च कमी कसा होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे किमती कमी ठेवण्यास हातभार लागणार आहे.
घरांच्या किमती वेगवेगळ्या घटकांमुळे वाढतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय खर्च, आकस्मिक खर्च, बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ या बाबी गृहीत न धरता प्रत्यक्ष झालेला खर्च विचारात घेऊन यापुढे किमती निश्चित केल्या जातील.
- अनिल वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म्हाडा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.