

कूपर रुग्णालयात घाणीचे साम्राज्य
कंत्राटी घोळामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : विलेपार्ले येथील महापालिकेच्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात सध्या स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला असून, संपूर्ण रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत. मात्र, तो उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील साफसफाईचे काम पाहणाऱ्या कंत्राटी कंपनीची मुदत संपली आहे. मात्र, नवीन कंत्राट देण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट हालचाल झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, जुन्या कंत्राटदाराची सेवा समाधानकारक नसतानाही संचालकांनी ती तीन महिने वाढवून दिली होती. त्यानंतर केवळ तोंडी आदेशावर ही सेवा सुरू ठेवण्यात आली. या गोंधळात कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे पगारही थकवले असल्याचे समजते, परिणामी सफाई कामगारांनी कामाकडे पाठ फिरवली आहे.
रुग्णांचे आरोग्य टांगणीला
रुग्णालयातील वेटिंग एरिया, वॉर्डांचे कोपरे आणि पॅसेजमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ‘जीपीएस मॅप कॅमेरा’च्या फोटोंमधून ही विदारक स्थिती स्पष्टपणे समोर आली आहे. ओला आणि सुका कचरा अस्ताव्यस्त पडल्याने उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आम्ही उपचारासाठी येतो की आजार विकत घ्यायला, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. कूपर प्रशासन आणि महापालिका आयुक्त या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. कंत्राटी कंपन्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. जर पुढील २४ तासांत स्वच्छता झाली नाही, तर या परिसरात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन आता तरी जागे होऊन ठोस कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुग्णालयातील स्वच्छतेबाबत काही तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर सफाई कंत्राटदार बदलण्यात आला आहे. नव्या कंत्राटदारामार्फत शुक्रवारपासून रुग्णालय परिसरात व्यापक स्वच्छता आणि साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- डॉ. छाया शिंदे, अधिष्ठात्री, कूपर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.