उपचार अर्धवट सोडणाऱ्या एचआयव्ही रुग्णसंख्येत वाढ

उपचार अर्धवट सोडणाऱ्या एचआयव्ही रुग्णसंख्येत वाढ
Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : देशात एचआयव्हीबाधित रुग्णांच्या उपचारांबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे ‘नॅको’ने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. एआरटी केंद्रांमध्ये नोंदणी करूनही रुग्ण उपचार का सोडत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. २०२४ मध्ये लॉस्ट-टू-फॉलो-अपच्या व्याख्येत बदल करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहितीला उत्तर देताना ‘नॅको’ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. देशपातळीवरील स्थितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून २०२४-२५ पर्यंत उपचार मध्येच थांबवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. यावर माहिती अधिकार कार्यकर्ता चेतन कोठारी यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी आरटीआय दाखल करतो तेव्हा आकडेवारी बदललेली असते, याचे मला आश्चर्य वाटते. ‘नॅको’ने डिसेंबर २०२५ मध्ये काही माहिती दिली होती, ज्यामध्ये त्यांच्याच आधीच्या आरटीआयमधील माहिती नाकारली होती. आता या आरटीआय प्रतिसादातील डेटा आणि डिसेंबर २०२५ मध्ये ‘नॅको’ने दिलेली माहिती यात फरक असल्याचे कोठारी म्हणाले.

यासंदर्भात मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रुग्णांना पुन्हा उपचारांशी जोडण्यासाठी फोन कॉल, घरभेटी आणि ‘ट्रॅक-बॅक’सारख्या उपक्रमांना गती देण्यात आली आहे. नव्या रुग्णांसाठी उपचारपूर्व समुपदेशनही अधिक प्रभावी करण्यात आले आहे. अनेक रुग्ण गावी परत जातात किंवा कोणतीही माहिती न देता पत्ता बदलतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क तुटतो. रुग्णांनी कोणतीही अडचण, स्थलांतर किंवा औषधांशी संबंधित समस्या असल्यास संबंधित केंद्रांशी संपर्क ठेवावा, जेणेकरून उपचार सातत्याने सुरू राहू शकतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

योग्य आहारामुळे व्हायरल लोड कमी
एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. नियमित औषधोपचार आणि योग्य आहारामुळे व्हायरल लोड कमी राहतो तसेच सीडी चार काउंट चांगला राहिल्याने इतर संसर्गांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे संबंधित व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते. तरीही अनेक रुग्ण मोफत उपचार उपलब्ध असूनही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात.

चार वर्षांत ६२,८४० रुग्णांनी उपचार सोडले
२०२१-२२ या वर्षात १०,०७४ रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले, तर २०२२-२३ या वर्षात १४,४६६ रुग्णांनी उपचार सोडले. तसेच २०२३-२४ वर्षात १७,९८८ जणांनी उपचार सोडले, शिवाय २०२४-२५ यावर्षात २०,३१२ जणांनी उपचार सोडल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com