

ग्रँट रोड स्थानकात
प्रवासी लोकलखाली
पश्चिम रेल्वे विस्कळित; सहा लोकल फेऱ्या रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकात सोमवारी (ता. ११) सायंकाळी रेल्वे रूळ ओलांडत असताना एक प्रवासी लोकलखाली आल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे विरार दिशेकडील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही वेळ लोकल वाहतूक ठप्प झाली होती, तर सहा डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, सायंकाळी ७.५८च्या सुमारास ग्रँट रोड स्थानकाजवळ एक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असताना लोकलखाली आला. ही घटना लक्षात येताच संबंधित लोकल तत्काळ थांबविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, स्थानक प्रशासन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळित झाली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी फलाटांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
सुमारे २२ मिनिटांनंतर रात्री ८.२० वाजता संबंधित लोकल पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र तोपर्यंत वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेने डाऊन मार्गावरील सहा लोकल फेऱ्या रद्द केल्या. तसेच अनेक लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. नंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सध्या लोकल सेवा सुमारे पाच मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
रूळ ओलांडणे धोकादायक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून, अशा घटनांमुळे केवळ जीवितहानीच नाही तर संपूर्ण रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.