

‘लोकल’चा नवा संघर्ष
‘एसी’मुळे सामान्य लोकल कमी होत असल्याने प्रवाशांची नाराजी
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईच्या लोकल प्रवासात आता ‘एसी विरुद्ध सामान्य लोकल’ असा नवा संघर्ष उभा राहताना दिसत आहे. एका बाजूला वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय वेगाने वाढविला जात आहे; तर दुसऱ्या बाजूला लाखो सामान्य मुंबईकरांचा आधार असलेल्या साध्या लोकल फेऱ्या कमी होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये वाढत आहे. याच नाराजीचा उद्रेक नुकताच विरार स्थानकात झालेल्या आंदोलनातून पाहायला मिळाला.
मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये उपनगरीय लोकल ही सर्वात स्वस्त सेवा आहे. द्वितीय श्रेणी लोकलचे प्रति किलोमीटर भाडे केवळ २२ पैसे असून मासिक पासमध्ये ते ११ पैशांपर्यंत खाली येते. त्याउलट एसी लोकलसाठी प्रति किलोमीटर १.४० रुपये खर्च येतो. मासिक पासमध्येही मोठी तफावत आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेवर दररोज १,८२० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यापैकी १०८ एसी फेऱ्या असून हे प्रमाण सुमारे ५.९ टक्के आहे. पश्चिम रेल्वेवर १,४१४ फेऱ्यांपैकी १४५ एसी लोकल फेऱ्या चालतात. १ मेपासून हार्बर मार्गावर १४, तर पश्चिम रेल्वेवर १२ अतिरिक्त एसी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत; मात्र या नव्या फेऱ्यांसाठी अनेक साध्या लोकल कमी करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. विरार रेल्वे स्थानकात सोमवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजताची विरार-चर्चगेट ही नियमित साधी लोकल ‘एसी’मध्ये रूपांतरित करण्यात आल्याच्या निषेधार्थ हजारो प्रवासी रुळावर उतरले. या आंदोलनामुळे काही काळ पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. हार्बर मार्गावरही प्रवाशांनी स्वाक्षरी मोहीम सुरू करून विरोध दर्शविला आहे. एसी लोकलमुळे सामान्य लोकलमधील गर्दी, लोंबकळत प्रवास आणि वेळेचा ताण अधिक वाढल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईला आधुनिक सुविधा हव्यात, हे वास्तव आहे; मात्र त्या सुविधा सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला परवडणाऱ्या असतील का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनत आहे.
वातानुकूलित लोकल फेऱ्यांची स्थिती
रेल्वे एकूण फेऱ्या- एसी फेऱ्या- प्रमाण
मध्य रेल्वे- १,८२०- १०८- ५.९ टक्के
पश्चिम रेल्वे- १,४१४- १४५- १०.३ टक्के
......
मुंबईतील प्रति किलोमीटर प्रवास खर्च
प्रकार - प्रति किमी खर्च
लोकल द्वितीय श्रेणी - २२ पैसे
लोकल प्रथम श्रेणी - १.२५ रुपये
वातानुकूलित लोकल - १.४० रुपये
बेस्ट बस - २ रुपये
मेट्रो - ३.३३ ते ३.६३ रुपये
रिक्षा - १७ रुपये
टॅक्सी - २१ रुपये
ओला, उबर - ४० ते ४५ रुपये
सीएसएमटी-ठाणे प्रवास भाडे तुलना
प्रवास प्रकार- नियमित तिकीट- मासिक पास
द्वितीय श्रेणी- १५ - २१५
प्रथम श्रेणी - ८५ - ७५५
वातानुकूलित लोकल - ९५ - १,८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.