

स्वच्छता, कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा!
कांजूर डम्पिंग ग्राउंड, स्वच्छता चौकीला आयुक्तांची आकस्मिक भेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई शहराची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज (ता. १३) पहाटेपासून विविध ठिकाणांना आकस्मिक भेटी देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. विक्रोळीतील स्वच्छता कामगार चौकीपासून ते कांजूर येथील कचराभूमी प्रकल्पापर्यंत त्यांनी दीड तास पाहणी करीत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
सकाळी आयुक्तांनी एस विभागातील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवारनगरमधील स्वच्छता कामगारांच्या चौकीला भेट दिली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते आणि चौक स्वच्छतेवर भर द्यावा. ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो अशा जागांचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती वाढवावी. उपलब्ध आधुनिक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कांजूर येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून परिसरात दुर्गंधी पसरू नये, यासाठी पालिकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांची आयुक्तांनी पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पस्थळी कचऱ्यावर ‘बायो-एंझाइम’ द्रव्याची फवारणी आणि सुगंधी द्रव्यासाठी कार्यान्वित असलेल्या ११ मिस्टिंग कॅनन यंत्रणेची त्यांनी तपासणी केली.
सुमारे २९२ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या प्रकल्पात दररोज ५,२०० टन कचऱ्यावर बायोरिअॅक्टर तंत्रज्ञानाने आणि १,००० टन कचऱ्यावर खत निर्मितीद्वारे प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या मिथेन वायूचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. कचऱ्याचा हवेशी संपर्क टाळण्यासाठी त्यावर मातीचे आवरण टाकण्याच्या प्रक्रियेची त्यांनी पाहणी केली. तसेच रहिवाशांसाठी असलेल्या हेल्पलाइन क्रमांकाचाही आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यादरम्यान उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उपायुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर आणि कचरा साचणाऱ्या ठिकाणांचे समूळ उच्चाटन करणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी.
- अश्विनी भिडे, पालिका आयुक्त
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.