

माझगाव गोळीबारातील आरोपींना माहीममधून अटक
आर्थिक वादातून सुपारी दिल्याचे उघड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः माझगाव येथे समीर खान या तरुणावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अवघ्या काही तासांत माहीम परिसरातून अटक केली. सादिक शेख आणि जिशान खान अशी आरोपींची नावे आहेत.
समीर संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या आसिफ खान उर्फ आसिफ दाढी याचा मुलगा असून, मंगळवारी संध्याकाळी ६च्या सुमारास माझगाव येथील मीनाक्षी अपार्टमेंटमधील सायबान हॉटेलसमोर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. ती समीरच्या कंबरेवर निसटती लागली. घटना घडली तेव्हा आसपास उपस्थित व्यक्तींनी जखमी समीरला जे. जे. रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदवला. भायखळा पोलिसांव्यतिरिक्त गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता.
पोलिस उपआयुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभारी निरीक्षक सदानंद येरेकर, दिलीप तेजनकर, शरद धराडे, सुहास माने, सहाय्यक निरीक्षक अमोल माळी, रामदास कदम, सुहास देशमुख आणि पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून या हल्ल्यामागे सादिक, जिशान असल्याची नेमकी माहिती मिळवली. दोघे माहीम दर्गा परिसरात असल्याची माहिती प्राप्त करून पथकाने मध्यरात्री त्यांची धरपकड केली.
दोन आरोपींच्या अटकेसोबत गुन्ह्यात वापरलेली बंदूक, मोटारसायकल, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात पथक यशस्वी ठरले.
सैफने सादिक, जिशान यांना समीरवर गोळीबार करण्याची सुपारी दिली, अशी माहिती तपासातून पुढे आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पथकाकडून आता सैफचा शोध सुरू आहे. याशिवाय सुपारी गोळीबार करून घाबरवण्याची होती की हत्येची, याबाबतही अटक आरोपींकडे तपास सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
२० ते २५ लाखांच्या व्यवहारावरून वाद
प्राथमिक चौकशीत जखमी समीर आणि सैफ नावाच्या व्यक्तीमध्ये २० ते २५ लाख रुपयांच्या व्यवहारावरुन वाद होता. समीर हे पैसे देणे लागत होता. तगादा लावल्यावर पैसे देण्यास थेट नकार देणाऱ्या समीरला अद्दल घडविण्याच्या उद्देशाने सैफ याने हा गोळीबार घडवला.