ओशिवरा पुलाचा ‘दर्जा’ टांगणीवर

ओशिवरा पुलाचा ‘दर्जा’ टांगणीवर
Published on

ओशिवरा पुलाचा ‘दर्जा’ टांगणीवर

कमी दराच्या निविदेमुळे गुणवत्तेवर प्रश्न; चार कोटींची बचत हाेणार

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : रस्ते आणि पुलांच्या दर्जावरून महापालिका प्रशासनावर टीका होत असतानाच मालाड पश्चिमेकडील ओशिवरा नाल्यावरील पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा चर्चेत आला आहे. पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा तब्बल २६ टक्के कमी दराने कंत्राटदाराने हे काम घेतल्यामुळे या पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पुलाचा अंदाजित खर्च १६ काेटी ३० लाख रुपये असून, प्रत्यक्ष करार ११ काेटी ९८ लाख रुपये झाला आहे.

​लिंक रोडला जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा आहे. पालिकेच्या सल्लागाराने हा पूल धोकादायक असल्याचे घोषित केल्यानंतर अधिक खात्रीसाठी व्हीजेटीआय या नामांकित संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. संस्थेने पूल पाडून नव्या बांधकामाचा सल्ला दिल्यानंतर पालिकेने १६ कोटी ३० लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. निविदा प्रक्रियेत पाच कंत्राटदारांच्या स्पर्धेत एका कंत्राटदाराने ११ कोटी ९८ लाखांत हे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. हा पूल लिंक रोडवरील वाहतुकीचा मुख्य कणा आहे. आगामी १८ महिने या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याने मालाड आणि ओशिवरा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
----
कामे अन्‌ खर्च
- जुना पूल पाडून नवीन पुनर्बांधणी, बिअरिंग बदलणे आणि स्लॅब टाकणे ही कामे केली जाणार आहेत.
- पावसाळा सोडून १८ महिन्यांत काम केले जाणार आहे. जानेवारी २०२८ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
----
बचत की गुणवत्तेशी तडजाेड?
​महापालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी साहित्याचे दर आणि कामाचा आवाका पाहून १६ कोटींचे बजेट तयार केले होते. त्यापेक्षा चार कोटी ३२ लाख रुपये कमी दराने काम होणार असल्याने तांत्रिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. कमी दरात काम करताना कंत्राटदार साहित्याचा दर्जा राखणार का, असा सवाल विचारला जात आहे.
​---
प्रत्येक टप्प्यावर लक्ष!
कंत्राटदाराने कमी बोली लावली असली तरी कामाच्या प्रत्येक टप्प्यावर महापालिकेच्या अनुभवी अभियंत्यांचे बारीक लक्ष असेल. पुलाच्या मजबुतीबाबत आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पूल विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com