

आंदोलनामुळे रेल्वेसेवा विस्कळित
प्रवाशांचे हाल; ट्रेन मॅनेजर नव्या नियमाविरोधात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेतील ट्रेन मॅनेजरनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केल्यामुळे आज सायंकाळी प्रवाशांची फरपट झाली. कार्यालयातून घरी परतणाऱ्या लाखो जणांना विस्कळित लोकलसेवा, रद्द फेऱ्या आणि फलाटांवरील प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. नव्या सुरक्षा परिपत्रकाविरोधात ‘वर्क टू रूल’चा इशारा देत हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील सेवा कोलमडून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य परिवहन व्यवस्थापकांनी फलाट थांबा ओलांडण्याच्या घटना रोखण्यासाठी ७ मे रोजी सुरक्षा परिपत्रक क्रमांक १५ जारी केले आहे. त्यानुसार पुढील स्थानकात गाडी थांबवण्यासाठी ट्रेन मॅनेजरने एक बेल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संकेताला मोटरमनकडून प्रतिसाद न मिळाल्यास किंवा गाडी निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगात असल्याचे आढळल्यास ट्रेन मॅनेजरने तत्काळ ब्रेक कार्यान्वित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवरील शंभराहून अधिक स्थानकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्थानकासाठी अशी प्रक्रिया राबवणे व्यवहार्य नसल्याचा दावा ट्रेन मॅनेजर संघटनांनी केला आहे. नव्या नियमामुळे जबाबदारीचे ओझे एकतर्फी वाढवण्यात येत असून, याबाबत पूर्वचर्चा न करता निर्णय घेतल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने या विरोधात १२ मे रोजी प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानंतर बुधवारी ट्रेन मॅनेजरनी ‘वर्क टू रूल’ची अंमलबजावणी करत काही लोकलमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. परिणामी अनेक गाड्या फलाटावरच खोळंबल्या. काही फेऱ्या रद्द झाल्या, तर अनेक गाड्या २० ते २५ मिनिटे विलंबाने धावल्या.
...
फलाटांवर गोंधळ
सीएसएमटी, दादर, घाटकोपर आणि ठाणे स्थानकांवर संध्याकाळी मोठी गर्दी झाली. सीएसएमटी येथे सायंकाळी ५.४५ वाजताची आसनगाव जलद लोकल ६.१५ नंतरही फलाटावर उभी होती. त्याच वेळी ६.०६ वाजताची अंबरनाथ लोकल आधी सुटणार असल्याची घोषणा झाल्याने प्रवाशांनी धावाधाव केली. आधीच प्रचंड गर्दीमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांचा संताप आणखी वाढला.
...
एसी लोकल ठप्प
एसी लोकल सेवेलाही याचा फटका बसला. परळहून सायंकाळी ६.४५ वाजता सुटणारी कल्याण एसी लोकल स्थानकातच तुडुंब भरली. अतिरिक्त गर्दीमुळे दरवाजे बंद होत नसल्याने रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. काही काळ स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
...
तोडग्यासाठी बैठक
वादावर तोडगा काढण्यासाठी १८ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुरक्षा परिपत्रकाबाबत पुनर्विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालय उपाध्यक्ष विवेक सिसोदिया यांनी दिली.