

नालेसफाईतील दिरंगाई भोवणार
दोन दिवसांत गाळ न उपसल्यास अभियंत्यांवर कारवाईचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील नदी व नाल्यांतून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत निर्धारित ठिकाणी हलवणे बंधनकारक असतानाही, अनेक ठिकाणी गाळाचे ढीग रस्त्याकडेलाच पडून असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी संबंधित अभियंत्यांना कडक इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार (ता. १४) आणि शुक्रवारी (ता. १५) मुंबईत विशेष गाळ वाहतूक मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
महापालिका मुख्यालयात बुधवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत बांगर बोलत होते. या वेळी प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) सुनीलदत्त रसाळ व इतर अधिकारी उपस्थित होते. ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांनी दररोज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. कोणत्याही परिस्थितीत गाळाचे ढीग रस्त्यावर दिसता कामा नयेत, याची खातरजमा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणांचा अभियंत्यांनी स्वतः शोध घेऊन तिथे प्रभावी उपाययोजना कराव्यात. पाणी साचणाऱ्या ठिकाणांच्या ५० ते १०० मीटर परिघातील पर्जन्य जलवाहिन्या आणि कल्व्हर्ट्सची सखोल स्वच्छता करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले.
----
तरंगता कचरा काढणार
नाल्यातील काढलेला गाळ वाहतूक करण्यासोबतच ‘फ्लोटिंग मटेरियल’ (तरंगता कचरा) काढण्यावर भर देण्यात येणार आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा विशेष मोहीम राबवून नाल्यांमधील कचरा काढला जाईल. नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
.........