

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुलभ करण्यासोबतच माॅन्सून काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार विविध मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत लावलेली तब्बल १०० किमीहून अधिक रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवली आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून, प्रवास सुलभ होणार आहे.
मुंबई, ठाणे परिसरात ‘एमएमआरडीए’कडून मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे सुरू आहेत. नियमित वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी कामे करावी लागत असल्याने बॅरिकेडिंग करावे लागते. दरम्यान, मेट्रोच्या अनेक ठिकाणच्या व्हायाडक्ट व संरचनात्मक कामांमध्ये मोठी प्रगती झाल्यानंतर मॉन्सूनपूर्व काळात नागरिकांच्या वाहतुकीसाठी अधिकाधिक रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एमएमआरडीए’कडून पूर्ण झालेल्या मेट्रो व्हायाडक्टखालील बॅरिकेड्स टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत. ‘एमएमआरडीए’चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी कमी होणे, रस्त्यांची उपलब्धता वाढणे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होणे तसेच मॉन्सून काळात प्रवाशांना अधिक सुलभ व सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
आपत्कालीन यंत्रसामग्री तैनात
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोसह सर्व प्रकल्पाच्या कंत्राटदार, सल्लागार संस्था आणि प्रकल्प यंत्रणांना स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद पथके, डिवॉटरिंग पंप, आपत्कालीन यंत्रसामग्री, सुरक्षा कर्मचारी आणि २४ तास तयारी यंत्रणा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून माॅन्सून काळात प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राखता येईल.
रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवली
- मेट्रो मार्ग २बी (डी. एन. नगर-मंडाळे) :१८.२७७ किमी
- मेट्रो मार्ग ४ व ४ए (वडाळा-कासारवडवली-गायमुख) :३१.७०६ किमी
- मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी) :११.१३४ किमी
- मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर-विक्रोळी) : २८.९५२ किमी
- मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व-मिरा-भाईंदर) : १७.२७५ किमी
- मेट्रो मार्ग १२ (कल्याण-तळोजा) : ७.१७४ किमी
- मेट्रो मार्ग ७ए (अंधेरी पूर्व-छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ) : टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स हटविण्याचे काम सुरू
‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये माॅन्सूनपूर्व तयारी आणि बॅरिकेड्स हटविण्याची ही प्रदेशातील सर्वात मोठ्या समन्वित मोहिमांपैकी एक आहे. विविध मेट्रो मार्गांवरील व्हायाडक्ट व संरचनात्मक कामे मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे गेल्याने, मॉन्सूनपूर्व काळात नागरिकांसाठी अधिकाधिक रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने पूर्ण झालेल्या मेट्रो मार्गांखालील बॅरिकेड्स नियोजनबद्ध पद्धतीने हटविण्यात येत आहेत.
- डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.