मुंबई टू डे : सह्याद्रीत मध्य रेल्वेचे अभेद्य सुरक्षा कवच

मुंबई टू डे : सह्याद्रीत मध्य रेल्वेचे अभेद्य सुरक्षा कवच
Published on

सह्याद्रीत मध्य रेल्वेचे अभेद्य सुरक्षा कवच
- कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळण्याच्या घटनांना लगाम
- चार वर्षांत तब्बल ९० टक्के घट

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : दरवर्षी पावसाळा सुरू होताच सह्याद्रीतील कर्जत-लोणावळा घाट विभागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची भीती निर्माण होत असते. घाट विभागातील भौगोलिक रचना आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहत असे. अनेकदा दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होण्याच्या घटना घडत असत. मात्र, मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत घाट विभागात राबविलेल्या व्यापक, नियोजनबद्ध आणि सुरक्षा उपायांचा आता स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. परिणामी, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये चार वर्षांत तब्बल ९० टक्क्यांनी घट झाली असून, यंदा २०२५ मध्ये आतापर्यंत एकही घटना नोंदविण्यात आलेली नाही.

कर्जत-लोणावळा घाट विभाग हा मध्य रेल्वेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. सह्याद्रीच्या उंच कड्यांमधून जाणाऱ्या या मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने घाट विभागातील धोकादायक ठिकाणांची वैज्ञानिक पद्धतीने पाहणी करून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात नाले बांधणी, कॅनिडी फेसिंग, उतार स्थिरीकरण, स्टील जाळी बसविणे, दगड सैल होऊ नयेत यासाठी विशेष मजबुतीकरण तसेच पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी अत्याधुनिक ड्रेनेज व्यवस्था उभारण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये कर्जत-लोणावळा घाट विभागात दरड कोसळण्याच्या २४ घटना नोंदवल्या गेल्या होत्या. २०२२ मध्ये हा आकडा ११ वर घसरला. त्यानंतर २०२३ मध्ये केवळ ३, तर २०२४ मध्ये फक्त दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये आतापर्यंत एकही दरड कोसळण्याची घटना नोंदलेली नाही.


------
२४ तास दक्षतेचा पहारा
पावसाळ्यापूर्वी विशेष पाहणी मोहीम राबविण्यात येते. याअंतर्गत घाट विभागातील सर्व संवेदनशील ठिकाणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केली जातात. पावसाळ्यात २४ तास गस्त, सतर्क पथकांची नियुक्ती, नियंत्रण कक्षातून सातत्यपूर्ण देखरेख आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवली जाते.

------------------
संपूर्ण यंत्रणा सज्ज
यंदाच्या मॉन्सूनपूर्व तयारीअंतर्गतही मध्य रेल्वेने घाट विभागातील सर्व संवेदनशील ठिकाणांची तपासणी पूर्ण केली असून, आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. प्रवाशांचा प्रवास अखंड, सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्राफिक्स -
दरड कोसळण्याच्या घटनांची आकडेवारी
२०२१ : २४ घटना
२०२२ : ११ घटना
२०२३ : ३ घटना
२०२४ : २ घटना
२०२५ : ० घटना (आतापर्यंत)
- चार वर्षांत सुमारे ९०% घट
...
मध्य रेल्वेचे प्रतिबंधात्मक उपाय
- नाले व पाणी निचरा सुधारणा
- कॅचपिट व कॅनिडी फेसिंग
- उतार स्थिरीकरण
- स्टील जाळी बसविणे
- खडक मजबुतीकरण
- आधुनिक ड्रेनेज व्यवस्था
- सेन्सर आधारित तांत्रिक निरीक्षण
- दरडप्रवण ठिकाणी नियमित तपासणी
- २४x७ देखरेख व गस्त पथके
- आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com