

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा
‘नीट’प्रकरणी राज ठाकरे यांची टीका; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : ‘‘केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा ‘नीट’ पेपरफुटीमुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे. १०-१० लाख रुपयांना पेपर विकले जात असताना २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे,’’ अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात ‘नीट’ परीक्षेच्या मूळ हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०१६ पासून या परीक्षेला विरोध करत असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘‘सगळं काही एकछत्री अमलाखाली आणण्याच्या केंद्र सरकारच्या खुमखुमीमुळे सामान्य घरातील मुला-मुलींचा बळी दिला जात आहे. दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात मिळून ३५० हून अधिक मेडिकल कॉलेजेस आहेत, तर उत्तर भारतात ही संख्या निम्मीच आहे. उत्तरेतील विद्यार्थ्यांना दक्षिणेत घुसवण्यासाठी आणि तिथल्या कोचिंग क्लासेसचे हित जपण्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरू आहे का,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परीक्षेतील त्रुटींवर बोट ठेवताना राज ठाकरे म्हणाले की, ‘‘७२० पैकी ७२० गुण मिळणे किंवा परस्पर ग्रेस मार्क्स देणे या गोष्टी अशक्य वाटणाऱ्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आणि व्यवस्था वाकवण्याची शक्ती आहे, त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर बाहेर पडतील, त्यांच्या हातात आपण आपले आरोग्य देणार आहोत का,’’ असा गंभीर प्रश्न त्यांनी विचारला आहे.
प्रधान हे पदाला चिकटून
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, ‘‘इतके घोळ होऊनही प्रधान हे पदाला चिकटून बसले आहेत. बहुदा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटाने राबवत आहेत. म्हणून त्यांना ही बक्षिसी दिली आहे का? २२ लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती झालीच पाहिजे.’’
तुमच्या सत्तेचा उपयोग काय
या वेळी राज ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारलाही सुनावले. ‘‘पेट्रोल-डिझेल वाचवण्याचे फोटो काढण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी पाठीचा कणा ताठ करा. दक्षिणेतील राज्यांच्या सुरात सूर मिसळून ‘नीट’ रद्द करण्याची मागणी करा. जर महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल, तर तुमच्या सत्तेचा उपयोग काय,’’ अशा शब्दांत त्यांनी राज्यकर्त्यांना ठणकावून सांगितले.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.