

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका वृद्धांना
हेल्पएज इंडियाच्या अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वाधिक फटका वृद्ध व्यक्तींना बसत असून विशेषतः एकटे राहणारे, विधवा महिला, अपंग तसेच अतिवृद्ध नागरिक अधिक असुरक्षित असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. वाढते तापमान, आरोग्यविषयक अडचणी, आर्थिक असुरक्षितता आणि सामाजिक आधाराचा अभाव यामुळे वृद्धांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘हेल्पएज इंडिया’ने केलेल्या या अभ्यासानुसार, हवामान बदलाचे परिणाम केवळ शारीरिक धोक्यांपुरते मर्यादित नसून आरोग्य, उपजीविका, निवास, काळजी व्यवस्था आणि सामाजिक कल्याणावरही व्यापक परिणाम करतात. वाढत्या वयानुसार शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक मर्यादा वाढत असल्याने आपत्तींचा सामना करण्याची क्षमता कमी होत जाते.
अभ्यासात सहभागी झालेल्या वृद्धांपैकी ६० टक्के लोकांनी उष्णतेपासून पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे सांगितले. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी ९० टक्के लोक घरात राहणे आणि ८९ टक्के लोक पाणी पिण्याचे प्रमाण वाढविणे, असे उपाय करीत असले तरी ७४ टक्के लोकांनी आजार वाढल्याचे, ५४ टक्के लोकांनी दैनंदिन परिस्थिती आणखी कठीण झाल्याचे आणि ३२ टक्के लोकांनी आरोग्य सुविधांच्या अभावाची समस्या असल्याचे सांगितले.
कुटुंब हा मुख्य आधार
भारतातील बहुतांश वृद्धांसाठी कुटुंब हा आधाराचा मुख्य स्तंभ असल्याचे अभ्यासात दिसून आले. सुमारे ७३ टक्के वृद्ध आपल्या मुलांसोबत किंवा नातेवाइकांसोबत राहतात. त्यापैकी ९४ टक्के वृद्धांना कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळते. देखभालीची जबाबदारी प्रामुख्याने मुलगे (३१ टक्के), जीवनसाथी (३० टक्के) आणि सुना (१७ टक्के) सांभाळतात; मात्र रोजगारासाठी होणारे स्थलांतर या आधारव्यवस्थेवर परिणाम करीत आहे. सर्वेक्षणातील १८ टक्के कुटुंबांनी कुटुंबातील एखादा सदस्य रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याचे सांगितले. यामुळे वृद्धांना मिळणाऱ्या आधारात घट होण्याची शक्यता वाढत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सुरक्षेचा अभाव
अभ्यासानुसार ५५ टक्के वृद्धांकडे स्वतःची शेती नाही. जवळपास निम्म्या वृद्धांसाठी पेन्शन हेच मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. अनेक जण शेती, शेतमजुरी किंवा इतर मजुरीवर अवलंबून आहेत. चिंतेची बाब म्हणजे १६ टक्के वृद्धांकडे कोणतेही काम किंवा उत्पन्नाचे साधन नाही. वय वाढत जाईल तसे उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने आर्थिक जोखीम वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सरकारी योजनांचा आधार
वृद्धांमध्ये सार्वजनिक कल्याणकारी योजनांची माहिती मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. सार्वजनिक वितरण प्रणाली, पेन्शन योजना, आरोग्य सुविधांवरील सवलती आणि गृहनिर्माण सहाय्य या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. तथापि, दीर्घ प्रतीक्षा, डिजिटल सुविधांचा अभाव आणि अर्ज प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे अनेक वृद्धांना योजनांचा लाभ मिळवताना अडचणी येत असल्याचे अभ्यासात आढळले.
वृद्धांना केंद्रस्थानी ठेवण्याची गरज
हेल्पएज इंडियाचे सीईओ रोहित प्रसाद यांनी सांगितले, की हवामान अनुकूलन, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक संरक्षण योजनांमध्ये वृद्धांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्थेच्या पॉलिसी रिसर्च आणि ॲडव्होकेसी विभागाच्या प्रमुख अनुपमा दत्ता यांनीही हवामान बदलाचा वृद्धांवर होणारा असमान परिणाम अधोरेखित केला.
कृतीची आवश्यकता
अभ्यासात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृद्धांची क्षमता आणि अनुभव यांचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य सेवा, काळजी व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि समुदाय-आधारित आधारव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, हवामान बदलाशी संबंधित धोरणांमध्ये वृद्धांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सक्षम जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.