

महापालिकेच्या सात ‘एसटीपी’चे काम पूर्ण
मुंबईला मिळणार १,२३३ एमएलडी शुद्ध पाणी; इतर वापरासाठी होणार पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या सात मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ पर्यंत मुंबईला दररोज तब्बल १,२३३ दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी ‘तृतीयक प्रक्रिये’द्वारे अत्यंत प्रगत पद्धतीने शुद्ध केले जाणार आहे. त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होणार असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई महापालिका राबवत असलेल्या १७ हजार १८१ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. भांडुप येथील प्रकल्प याच वर्षी ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल, तर उर्वरित सहा प्रकल्पांचे काम जुलै २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. पावसाळ्यात प्रक्रिया केलेले पाणी वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रत्यक्ष वापरासाठी हे पाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ पासून पुरवले जाणार आहे.
गेल्या चार वर्षांत या प्रकल्पांमधील तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने, उर्वरित कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
सध्या मुंबईची दररोजची पाण्याची मागणी चार हजार ६६५ एमएलडी असून, प्रत्यक्ष पुरवठा केवळ चार हजार १०० एमएलडी होतो. म्हणजेच मुंबईत दररोज ५६५ एमएलडी पाण्याची तूट आहे. २०४१ पर्यंत ही मागणी सहा हजार ४२४ एमएलडीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प भविष्यात मुंबईसाठी संजीवनी ठरणार आहे.
---
सातही एसटीपी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईला दररोज सुमारे १,२३३ एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध होईल. या पाण्याचा वापर औद्योगिक कारखाने, बांधकामे, रेल्वे व गाड्यांची साफसफाई, तसेच झाडांसाठी करता येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होईल.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त
.....
प्रकल्पनिहाय काम पूर्ण (टक्क्यांमध्ये)
भांडुप - ७८.२०
धारावी - ६७.६१
वर्सोवा - ६४.८४
वांद्रे - ६०.४२
घाटकोपर - ५९.००
वरळी - ५६.३०
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.