कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज

कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज
Published on

कोस्टल रोड बोगद्यांतील आग नियंत्रणासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज
६.३२ कोटींचे अत्याधुनिक वॉटर मिस्ट टर्बाइन वाहन घेणार
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २४ : मुंबई शहराचा वाढता विस्तार आणि पायाभूत सुविधांचा विकास लक्षात घेता, महापालिकेने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक वॉटर मिस्ट टर्बाइन वाहन दाखल होणार आहे.
​मुंबई अग्निशमन दलाच्या अधिपत्याखाली सध्या ३५ अग्निशमन केंद्रे आणि ३०० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा कार्यरत आहे. मात्र कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील आग विझवणे आणि बचावकार्य करणे हे नेहमीच एक मोठे आव्हान असणार आहे. हेच आव्हान पेलण्यासाठी या विशेष टर्बाइन वाहनाची खरेदी केली जात आहे.
​अग्निशमन दलात नव्याने दाखल होणाऱ्या या वाहनाची काही वैशिष्ट्ये असणार आहेत. हे वाहन अत्याधुनिक सांगाड्यावर आधारित असेल.
​कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील आपत्कालीन अग्निशमन आणि विमोचन (रेस्क्यू) कार्यासाठी याचा उपयोग होणार आहे. दोन वर्षांच्या पूर्ण हमी कालावधीसह हे वाहन दलात समाविष्ट होईल. ​उत्पादक कंपनीच्या सेवा अभियंत्यांद्वारे अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे वाहन हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
​​या वाहनाच्या खरेदीसाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. यामध्ये चार निविदाकारांनी प्रतिसाद दिला होता. तांत्रिक छाननीनंतर मे. युनिकेअर इमरजन्सी इक्युपमेंट प्रा. लि. यांची निविदा सर्वात योग्य आणि कार्यालयीन अंदाजापेक्षा १.१६ टक्के कमी दराची ठरली. या एक नग वाहनाच्या बांधणी, पुरवठा आणि चाचणीसाठी एकूण सहा कोटी ३२ लाख ८०० रुपये खर्च कंत्राटदाराला मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
​कार्यादेश मिळाल्यापासून पुढील सहा महिन्यांच्या आत हे वाहन मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा मुख्यालयात पोहोचवणे बंधनकारक असणार आहे. तत्पूर्वी, मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उत्पादकाच्या ठिकाणी पंपाची क्षमता, सिझर लिफ्ट, टर्बाइन, पोर्टेबल फोम सिस्टीम आणि वाहनाची रोड टेस्ट अशा चार कडक टप्प्यांमध्ये तपासणी केली जाईल.

स्‍थायी समितीत प्रस्‍ताव
कोस्टल रोडवरून प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खरेदीला तातडीची बाब म्हणून प्राधान्य देण्यात आले आहे.
हा प्रस्ताव स्थायी समितीची मंजुरी मिळण्यासाठी सादर करण्यात आला आहे. विरोधक आणि सत्ताधारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com