

धावत्या लोकलमध्ये खुनाचा थरार
आरोपी २४ तासांत पनवेलमधून जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : पावसाचे पाणी शिरू नये म्हणून लोकलच्या प्रथम श्रेणी डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका प्रवाशाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना मंगळवारी (ता. २३) रात्री चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये घडली. मयंक लोहार (वय २२) असे मृताचे नाव आहे. हल्ल्यानंतर पसार झालेल्या रोशन सुवर्णा (३०) या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पनवेल परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १०.५० वाजता मयंक लोहार हा चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलच्या मधल्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होता. अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे डब्यात पाणी शिरत होते. या वेळी दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने मयंकच्या पोटात वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्री ११.०४ वाजता लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच आरोपीने गर्दीचा फायदा घेत पलायन केले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) कर्मचारी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकला बोरिवली स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्री ११.४२ वाजता त्याला रुग्णवाहिकेद्वारे कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी पहाटे ५.०५ वाजता बोरिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पश्चिम परिमंडळातील रेल्वे पोलिस आणि गुन्हे शाखेची सात विशेष पथके तयार करण्यात आली होती.
...
सीसीटीव्हीचा मागोवा
शोध पथकांनी बोरिवली, अंधेरी, मिरा रोड, नालासोपारा रेल्वे स्थानकांसह परिसरातील ४००हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मिरा रोड पूर्व येथील रहिवासी व बारकोड बनविण्याचा व्यवसाय करणारा रोशन सुवर्णा या आरोपीला पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून, पुढील तपास बोरिवली लोहमार्ग पोलिस करीत आहेत.
...
घटनाक्रम असा
- रात्री १०.५० वाजता प्रथम श्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्यावरून वाद
- वादानंतर रोशन सुवर्णाकडून मयंक लोहार याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला
- रात्री ११.०४ वाजता लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच आरोपी फरार
- रात्री ११.४२ वाजता जखमी मयंकला शताब्दी रुग्णालयात दाखल
- उपचारादरम्यान मयंकचा मृत्यू
- पहाटे ५.०५ वाजता बोरिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- सात विशेष पथके तपासासाठी सक्रिय
- ४०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले
- २४ तासांत आरोपीला बेड्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.