

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचचे २ ऑक्टोबरपासून मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन
मुंबई, ता. २८ : शाळा, महाविद्यालये आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून येत्या २ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी जिल्हा व विभागनिहाय परिषदा आणि प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
पुणे येथे १६ ऑगस्ट २०२४ला झालेल्या व्यापक बैठकीत राज्यातील विविध भागांतील शिक्षण क्षेत्राशी संबंधित दीडशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी या बैठकीत सरकारी व अनुदानित शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या संभाव्य परिणामांवर चर्चा केली. शिक्षणाची वाढती दुरवस्था आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यव्यापी जनआंदोलन व प्रबोधन चळवळ उभारण्याचा निर्णय त्या वेळी घेण्यात आला.
मंचच्या प्रमुख मागण्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेणे तसेच गाव, तांडा, वाडी-वस्ती तेथे शाळा हे धोरण कायम ठेवणे यांचा समावेश आहे. एक विद्यार्थी असला तरी शाळा सुरू ठेवावी आणि प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंचने केली आहे. तसेच १५ मार्च २०२४च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा करीत हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीही मंचने केली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खासगीकरण आणि बाजारीकरण वाढण्याची शक्यता असून, १,००० विद्यार्थीसंख्येच्या अटीमुळे ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांतील महाविद्यालये बंद होण्याचा धोका असल्याचे मंचचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिक्षणातील विषमता दूर करण्यासाठी केजी ते पीजीपर्यंत सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे तसेच शिक्षणावरील सार्वजनिक खर्च वाढवून तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्क्यांपर्यंत नेण्यात यावा, अशा दीर्घकालीन मागण्याही मंचने मांडल्या आहेत.
सोमवारी मुंबईत बैठक
मुंबई व परिसरातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था-संघटना, डाव्या-पुरोगामी चळवळी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमींचा आंदोलनात सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी सोमवारी (ता. ३१) दुपारी ४ वाजता प्रभादेवी येथील शिक्षक भारती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा, जनजागृती आणि संघटनात्मक तयारी यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती मंचचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी दिली. तसेच शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था-संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.