तरुण गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे

तरुण गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे
Published on

तरुण गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे

तरुण याचिकाकर्त्याविरुद्घचा गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : शिक्षेचा उद्देश केवळ शिक्षा देणे हा नसून सुधारणा घडवून आणणे असावे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करण्याची आणि मुख्य प्रवाहात परतण्याची तरुण गुन्हेगारांना संधी मिळाली पाहिजे, असेही स्पष्ट करून न्यायालयाने तरुणाविरुद्ध २०१५ मध्ये दाखल गुन्हा नुकताच रद्द केला.

जमावासोबत झालेल्या वादादरम्यान कथितरीत्या तलवार उगारल्याचा आरोप वयाच्या १९ वर्षीय तरुणावर होता; मात्र घटनेच्या वेळी याचिकाकर्ता बारावीचा विद्यार्थी होता आणि त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने तरुणाची गुन्हा रद्द करण्याची मागणी मंजूर करताना नमूद केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी केलेल्या घटनेच्या तपशिलाची आणि साक्षीदारांच्या जबाबाची दखल घेऊन, तलवार हातात धरण्याची कृती वरकरणी ‘गुन्हेगारी स्वरूपाची धमकी’ वाटत असली, तरी त्यामागील परिस्थितीचाही विचार करणे आवश्यक न्यायालयाने आदेशात नमूद केले. घटनेच्या वेळी तलवार उगारणारा याचिकाकर्ता मोठा झाला असून तो आता सुशिक्षित आहे. त्याला एका आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीकडून नोकरीची संधीही चालून आली आहे, त्यामुळे याचिकाकर्त्याला तुरुंगात खितपत ठेवणे किंवा खटल्याला सामोरे जाण्यास भाग पाडले, तर त्याची न्यायव्यवस्था आणि समाजावरील श्रद्धा उडेल व तो गुन्हेगारीच्या मार्गाला लागण्याची दाट शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सुधारणावादी दृष्टिकोन आवश्यक
तरुण गुन्हेगारांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुधारणावादी दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना चांगले नागरिक म्हणून आणि सन्मानाने उपजीविकेच्या साधनांची संधी मिळू शकेल, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच, दादर पोलिस ठाण्यात याचिकाकर्त्याविरोधात नोंदवलेला गुन्हा आणि त्यासंबंधित पुढील सर्व कायदेशीर कार्यवाही रद्द केली. याचिकाकर्त्यावर अन्य कोणताही गुन्हा दाखल नसल्यास, त्याच्या रोजगारासाठी त्याला पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विचार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तर कायदा हातात घेण्याबाबत ताकीद देताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला १० हजार रुपयांचा दंड आकारला.

प्रकरण काय?
वडाळास्थित एका चाळीत ६ जून २०१४ मध्ये दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले. एकाच कुटुंबातील १५ ते २० सदस्य तक्रारदारासह अन्य एका कुटुंबातील सदस्यांचा शोध घेण्यासाठी तिथे गेले होते; परंतु तेथे कोणीही न सापडल्यामुळे हा गट शोध घेण्यात येत असलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाइकांच्या घरी गेला. तेथे याचिकाकर्ता आणि दोन महिला उपस्थित होत्या. शेजारी राहणाऱ्या साक्षीदारांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, जमावाचा सामना करताना याचिकाकर्त्याने त्यांना दूर ठेवण्यासाठी तलवार उगारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com